व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण टोरंट प्रकल्पावरून महायुतीतच मतभेद? अजित पवार गटाची फेरविचाराची मागणी

टोरंट प्रकल्पावरून महायुतीतच मतभेद? अजित पवार गटाची फेरविचाराची मागणी

सुनील तटकरे यांच्या भूमिकेमुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता!

Mumbai : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता सत्ताधारी महायुतीमध्येही मतभेदांचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने या प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सह्याद्रीच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचा तसेच मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केल्याने सरकारसमोर नवी राजकीय आणि पर्यावरणीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

भीमाशंकर परिसराच्या कुशीत आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी विविध शासकीय परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. मात्र, प्रकल्पाच्या कामासाठी होणारी वृक्षतोड, पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम आणि स्थानिक नागरिकांच्या हरकती यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध होत आहे.

डीलिमिटेशनसाठी खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी भूमिका मांडली. सह्याद्रीचा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सरकार योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, तटकरे यांची ही भूमिका महायुती सरकारसाठी महत्त्वाची मानली जात आहे. कारण विरोधकांच्या टीकेनंतर आता सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षाकडूनही पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी साई डोंगर परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली. प्रकल्पासाठी प्रस्तावित रस्त्याच्या कामाकरिता जमीन मोजणी करण्यासंदर्भातील नोटिसा शेतकऱ्यांना पाठवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढली आहे. ठाकरे गटाने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून आगामी काळात मोठे आंदोलन उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

नागपूरचे नाव दीक्षाभूमी करा, संजय राऊतांची गुगली

एकीकडे विरोधकांकडून प्रकल्पाला विरोध होत असताना दुसरीकडे अजित पवार गटानेही फेरविचाराची मागणी केल्याने महायुतीतील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, अशी भूमिका स्थानिकांकडून मांडली जात आहे. त्यामुळे सरकार हा प्रकल्प पुढे नेणार की पर्यावरणीय आणि स्थानिक आक्षेपांचा विचार करून त्यात बदल करणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!