व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजप – शिंदे गटातील नाराजीनाट्य चव्हाट्यावर!

भाजप – शिंदे गटातील नाराजीनाट्य चव्हाट्यावर!

शिंदेंच्या दौऱ्याकडे भाजपची पाठ; शरद पवार गट मात्र सोबत

Mumbai : राज्यातील महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्ष राजकीय घडामोडींमधून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवसीय पंढरपूर दौऱ्यादरम्यान भाजपच्या एकाही आमदाराने त्यांची भेट न घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, भाजप आमदारांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे दोन आमदार मात्र संपूर्ण दौऱ्यात शिंदे यांच्यासोबत दिसले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात स्थानिक भाजप नेते आणि आमदारांकडून त्यांच्या स्वागतासाठी किंवा भेटीसाठी विशेष पुढाकार घेतला गेला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपच्या एकाही आमदाराने शिंदे यांची भेट घेतली नाही. याउलट माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या निवासस्थानी शिंदे यांचे स्वागत करत त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या संबंधांबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘माझ्या आकड्यावर आक्षेप असेल तर समोर येऊन बोला!’ राऊतांचा गंभीर आरोप

या नाराजीनाट्यामागे सातारा आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांमधील राजकीय भूमिका कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाने परस्परविरोधी भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेल्याचे बोलले जात आहे.

पंढरपूरमधील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरही भाजप नेत्यांच्या भूमिकेची चर्चा रंगली. एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त स्थानिक भाजप आमदार समाधान आवताडे यांनीच स्वागताचे फलक लावले. अन्य भाजप नेत्यांनी मात्र अशा प्रकारचे फलक लावण्याचे टाळल्याचे चित्र दिसले. त्यामुळे हा केवळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक दाखवलेली नाराजी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यापूर्वी विधानसभा, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांमध्येही महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद उघड झाले होते. काही ठिकाणी या मतभेदांचा निवडणूक निकालांवरही परिणाम झाल्याची चर्चा होती. आता सोलापूरमधील घडामोडींमुळे भाजप आणि शिंदे गटातील दरी पुन्हा चर्चेत आली आहे.

१८६ कोटींचा चुराडा, तरीही ३९ टक्के पाणी ‘अदृश्य’

वरिष्ठ नेते महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत असले, तरी स्थानिक पातळीवरील या घडामोडी वेगळेच चित्र दाखवत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील हे नाराजीनाट्य आणखी तीव्र होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!