व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण विधानभवनापूर्वी बारामती ॲग्रोवर मोर्चा काढा; भाजप आमदार परिणय फुके यांचे रोहित पवारांना...

विधानभवनापूर्वी बारामती ॲग्रोवर मोर्चा काढा; भाजप आमदार परिणय फुके यांचे रोहित पवारांना आव्हान !

सरकारला घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला प्रत्युत्तर

Nagpur : हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आता भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. भाजप आमदार परिणय फुके यांनी पवारांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत थेट त्यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कारखान्यालाच लक्ष्य केले आहे. विधानभवनावर मोर्चा काढण्यापूर्वी बारामती ॲग्रोवर मोर्चा काढा, शेतकऱ्यांना उसाचा वाढीव दर द्या आणि त्यांची थकीत देणी अदा करा, असे खुले आव्हान फुके यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे.

शेतकरी कर्जमाफी, दुष्काळी मदत आणि सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याच्या मुद्द्यावर रोहित पवार यांनी शेगाव ते नागपूर असा ‘न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोर्चाऐवजी सरकारसोबत चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे

एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी फिरवणार’; नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट

 

दरम्यान, आमदार परिणय फुके यांनी रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या कारभारावर टीका केली. कंपनीकडून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे अद्याप दिले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांविषयी एवढीच आस्था असेल, तर आधी स्वतःच्या कारखान्यावर मोर्चा काढून उसाला वाढीव दर मिळवून द्यावा आणि थकीत पैसे अदा करावेत, असे फुके म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच बारामती ॲग्रोचा मुद्दाही राजकीय संघर्षाचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

यावेळी परिणय फुके यांनी गोवारी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. महायुती सरकारच्या काळात उच्च न्यायालयात बाजू मांडून प्रकरण जिंकल्यामुळे हजारो गोवारी बांधवांना जातवैधता प्रमाणपत्रे मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या उद्धव ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात समाजाची बाजू योग्य पद्धतीने मांडली नाही, त्यामुळे समाजाला प्रतिकूल निकालाचा सामना करावा लागला, असा आरोप फुके यांनी केला.

नागपूरच्या पुढील ५० वर्षांच्या पाणीटंचाईवर १,४०० कोटींचा उतारा?

आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे अपील करण्यात येणार असून गोवारी समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कैलास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, तिच्या माध्यमातून गोवारी समाजातील बांधवांना विविध शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

एकीकडे रोहित पवार यांच्या प्रस्तावित ट्रॅक्टर मोर्चामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारसमोर आव्हान उभे राहिले असताना दुसरीकडे परिणय फुके यांनी बारामती ॲग्रोचा मुद्दा उपस्थित करून पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राजकीय लढाई रंगण्याची चिन्हे आहेत.

___

 

error: Content is protected !!