नगरसेवक सागर भारुका यांना बाहेर काढण्याचे महापौरांचे आदेश
Akola शहरातील मदनलाल धिंग्रा चौकातील अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. अंडरपास महापालिकेच्या अखत्यारीतील विषय नसल्याचे स्पष्ट करत महापौर शारदा खेडकर यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित करणारे नगरसेवक सागर भारुका यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. यामुळे सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ‘तुम्ही मला काय बाहेर काढता, मीच बाहेर जातो,’ असे म्हणत भारुका यांनी स्वतःच सभागृहातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी नगरसेवक सागर भारुका हे आपल्या समर्थकांसह मदनलाल धिंग्रा चौकातील अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी थेट सभागृहात प्रवेश केला. यावेळी शर्टाची बटणे उघडून त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला.
हा प्रकार लक्षात येताच महापौर शारदा खेडकर यांनी त्यांना बेंचवर बसण्याची सूचना केली. तसेच सभागृहाची शिस्त आणि मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले. काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून भारुका यांची समजूत काढल्यानंतर ते शांत झाले आणि सभेचे कामकाज सुरू झाले.
‘कोण निवृत्त होणार हे जनता ठरवेल’, शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या
अंडरपासचा विषय पुन्हा उपस्थित
सभेच्या अखेरच्या विषयावर चर्चा सुरू असताना भारुका यांनी पुन्हा अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापौरांनी अंडरपास हा महापालिकेच्या अखत्यारीतील विषय नसल्याचे स्पष्ट केले. या समस्येच्या निवारणासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात आंदोलन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली होती. मात्र, भारुका यांनी पुन्हा हा विषय उपस्थित केल्याने सभागृहात वाद निर्माण झाला.
रोहित पवार स्वतःला राष्ट्रीय नेते समजू लागले आहेत, सुप्रिया सुळेंना खटकतंय; परिणय फुके यांचा दावा
‘तुम्ही मला काय बाहेर काढता, मीच बाहेर जातो’
महापौरांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतर संतप्त झालेल्या भारुका यांनी, ‘तुम्ही मला काय बाहेर काढता, मीच बाहेर जातो,’ असे म्हणत सभागृहाचा त्याग केला. बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला.
अंडरपासमधील पाण्याचा प्रश्न कायम
मदनलाल धिंग्रा चौकातील अंडरपासमध्ये पाणी साचण्याची समस्या अद्याप कायम आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या प्रश्नावरून यापूर्वीही नगरसेवक सागर भारुका यांनी महापालिकेत आवाज उठवला होता. यापूर्वी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेतही त्यांच्यावर कारवाई झाल्याने सोमवारी घडलेल्या प्रकाराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.








