महापौरांचे विरोधकांना खडेबोल, कायदेशीर तरतुदींवरून शाब्दिक संघर्ष
Akola महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू असताना नगरसेवकांना मोबाइलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास मनाई करणारा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. न्यायालयीन निर्णयांसह लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे दाखले देत दोन्ही बाजूंनी आपापली कायदेशीर भूमिका मांडली. अखेर सत्ताधारी शहर सुधार आघाडीने बहुमताच्या जोरावर व्हिडीओ चित्रीकरणास मनाई करणारा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
महापालिकेत नगरसेवकांची संख्या तीनने वाढल्याने सभागृहातील जागेची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहात बसून वार्तांकन करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर सभेचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आले; मात्र काही काळानंतर तेही बंद करण्यात आले. यामुळे नगरसेवकांनी सभागृहातील चर्चा आणि एकमेकांच्या संभाषणांचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना सभागृहात एकमेकांचे व्हिडीओ शूटिंग करता येऊ नये, असा प्रस्ताव सत्ताधारी गटाकडून मांडण्यात आला. यापूर्वी याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांना निलंबित करण्यात आले होते.
व्हिडीओ शूटिंगला मनाई करण्याच्या प्रस्तावावर बोलताना महापौर शारदा खेडकर यांनी विरोधकांना सुनावले. केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी व्हिडीओ शूटिंग केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवकांनी प्रसिद्धीच्या मागे न लागता प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करावे. तळागाळातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अंडरपासच्या पाण्यावरून सभागृहात रणकंदन, नगरसेवकाने सोडले सभागृह
विरोधकांकडून अकोलेकरांची दिशाभूल – विजय अग्रवाल
व्हिडीओ शूटिंगच्या मुद्द्यावर विरोधक प्रसिद्धीसाठी राजकारण करीत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी केला. विरोधक व्हिडीओ शूटिंग करून आपल्या सोयीनुसार त्यातील भागांची काटछाट करतात आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करून जनतेची दिशाभूल करतात, असे ते म्हणाले. सत्ताधारी विकासकामांमध्ये राजकारण करीत नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
‘सभागृहाची गरिमा’ शिकवू नका – डॉ. जिशान हुसेन
विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्यामागे विरोधकांना प्रसिद्धी हवी असल्याचे कारण दिले जात आहे. सभागृहाची गरिमा राखली जात नसल्याचे आरोपही केले जात आहेत. मात्र, यापूर्वीच्या सभांमध्ये सत्ताधारी नगरसेवकांनी वापरलेल्या शब्दांचीही तपासणी करावी. आम्हाला सभागृहाची गरिमा शिकवू नये, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.
‘कोण निवृत्त होणार हे जनता ठरवेल’, शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या
प्रस्तावावरील चर्चेदरम्यान महापालिका अधिनियमातील तरतुदी आणि सभागृहाचे अधिकार यांवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. डॉ. जिशान हुसेन यांनी महापालिका अधिनियमाचा आधार घेत हा निर्णय अन्यायकारक असल्याची भूमिका मांडली. तर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी असा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे सांगत सत्ताधारी गटाची बाजू मांडली. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेतील नियमांचे दाखलेही यावेळी देण्यात आले. कोणाला कोणत्या नियमांची माहिती आहे आणि महापालिकेला नेमके कोणते अधिकार आहेत, यावरून सभागृहात शाब्दिक चकमक रंगली. अखेर बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
संकटकाळात बाळासाहेब धावून येतात!
शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना नगरसेवक सुनील मेश्राम यांनी महापालिकेच्या कामकाजाची बाजू मांडली. पाणीटंचाईच्या काळात महापालिकेचे काम व्यवस्थित सुरू असून, आम्ही महापालिकेच्या पाठीशी आहोत, असे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर वंचितचे नगरसेवक पराग गवई यांनी शहरावर कोणतेही संकट आले की बाळासाहेब धावून येतात, अशी टिप्पणी केली.








