व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण २३ वर्षांपूर्वी नाकारलेला प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर; मेळघाटच्या वनसंपदेवर घाला घालण्याची तयारी!

२३ वर्षांपूर्वी नाकारलेला प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर; मेळघाटच्या वनसंपदेवर घाला घालण्याची तयारी!

२४० हेक्टर जंगल जमीन देण्याची तयारी; घनदाट वनक्षेत्रात तीन महिने खोदकाम, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा सरकारला सवाल

Amravati मेळघाटच्या समृद्ध वनसंपदेवर घाला घालणाऱ्या प्रस्तावित १,५०० मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी मेळघाटातील घनदाट जंगलातील तब्बल २४० हेक्टर जमीन देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी जंगल परिसरात खोदकाम (ड्रिलिंग) सुरू झाले असून, ते सलग तीन महिने चालणार आहे. या खोदकामातून काढण्यात येणारे दगड परीक्षणासाठी थेट दिल्लीला पाठविले जात आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, पर्यावरणीय कारणांमुळे तब्बल २३ वर्षांपूर्वी हाच प्रकल्प नाकारण्यात आला होता. मात्र, आता एका उद्योगसमूहाचे नाव पुढे आल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा मंजुरीच्या मार्गावर कसा पोहोचला, असा सवाल माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून, २००३ मधील लोकसभेतील एका उत्तराचा दाखलाही दिला आहे.

अकोल्यात पाणी टंचाई, मग स्विमिंग पूलच्या घश्यात टँकरने पाणी कशासाठी?

२००३ मध्ये पर्यावरणीय कारणांमुळे प्रस्ताव फेटाळला होता

डॉ. देशमुख यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, तत्कालीन केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने लोकसभेत अतारांकित प्रश्न क्रमांक ५९७६ (दिनांक ५ मे २००३) याच्या उत्तरात चिखलदरा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट केली होती.

तत्कालीन खासदार मोहन रावळे यांनी या प्रकल्पासाठी संबंधितांकडून मागण्यात आलेल्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पर्यावरण व वन राज्यमंत्री दिलीपसिंह जूदेव यांनी मेळघाटातील समृद्ध वनस्पती आणि प्राणिसंपदा तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची निकटता लक्षात घेता हा प्रस्ताव स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यामुळे २३ वर्षांपूर्वी पर्यावरणीय कारणांमुळे नाकारण्यात आलेल्या प्रकल्पाला आता मंजुरी कशी दिली जात आहे, असा सवाल डॉ. देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

‘एवढे रोजगार मिळणार असतील तर राजकारण सोडेन’

या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी रोजगारनिर्मिती होणार असल्याचा दावा केला जात असेल, तर त्यावरही डॉ. देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“मी स्वतः राज्याच्या जलसंपदा खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे अशा मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचे स्वरूप, त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीची व्याप्ती याची मला चांगली माहिती आहे. या प्रकल्पातून एवढ्या मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी रोजगार निर्माण होणार असतील, तर मी जाहीर माफी मागून राजकारण सोडून देईन,” असे आव्हान त्यांनी दिले.

वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात

विकासाच्या नावाखाली जमिनी ताब्यात घेऊन वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करण्याचा हा प्रकार असल्याची टीका वॉर (डब्ल्यूएआर) संस्थेचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी केली आहे.

“या निर्णयातून संविधानातील मूलभूत कर्तव्यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता असून, त्याचे गंभीर परिणाम भविष्यातील पिढ्यांना भोगावे लागतील,” असे कंचनपुरे यांनी म्हटले आहे.

बावनकुळेंच्या स्वागताला लखन मलिकांची अनपेक्षित हजेरी!

डोंगराचा मोठा भाग पोखरला जाण्याची भीती

प्रकल्पासाठी शासनाने संबंधित उद्योगसमूहाला २४० हेक्टर जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी घनदाट जंगल परिसरात खोदकाम सुरू झाले असून, हे काम सलग तीन महिने चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेत डोंगराचा मोठा भाग पोखरला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, या खोदकामाबाबत स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे मेळघाटच्या पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

error: Content is protected !!