व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पक्षांतराच्या संशयातून राजीनामा देणाऱ्या आमदार – खासदारांना बसणार लगाम?

पक्षांतराच्या संशयातून राजीनामा देणाऱ्या आमदार – खासदारांना बसणार लगाम?

सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस; तीन महिन्यांत निर्णय घेण्याच्या प्रस्तावावर लक्ष

New delhi : पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आमदार आणि खासदारांकडून राजीनाम्याचा मार्ग स्वीकारला जात असल्याच्या प्रकारांना आता आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा राजकीय खेळींना प्रतिबंध घालण्यासाठी घटनात्मक उपाययोजना करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावली असून, यामुळे देशातील पक्षांतराच्या राजकारणावर चर्चा सुरू झाली आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ए. सेथू यांनी दाखल केलेल्या याचिकेत लोकप्रतिनिधींकडून अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राजीनाम्याचा वापर केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. याचिकेनुसार, एखाद्या आमदार किंवा खासदाराविरोधात पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी राजीनामा देतात. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींना अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वीच परिस्थिती बदलते. परिणामी, संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरबंदीच्या तरतुदींचा मूळ उद्देशच बाधित होण्याची शक्यता आहे.

भाजपला शरद पवारांची साथ हवी, पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पेच कायम!

याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या श्रीमंत बाळासाहेब पाटील विरुद्ध कर्नाटक विधानसभा अध्यक्ष या खटल्यातील निकालाचा संदर्भ दिला आहे. केवळ राजीनामा दिल्यामुळे यापूर्वी घडलेल्या कथित पक्षांतरासंदर्भातील अपात्रतेची कारवाई आपोआप संपुष्टात येत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. तसेच केशम मेघचंद्र सिंह विरुद्ध मणिपूर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या याचिकांवर साधारणपणे तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली आहे.

अपात्रतेच्या प्रकरणांचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर असल्याने राजकीय हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणांसाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय अपात्रतेच्या नोटिसा, राजीनामे, सुनावणीच्या तारखा आणि अंतिम निर्णय सार्वजनिक करण्याची सूचनाही याचिकेत करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी फिरवणार’; नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट

प्रलंबित किंवा संभाव्य अपात्रता कारवाईच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देणाऱ्या लोकप्रतिनिधींना अपात्रतेचा प्रश्न निकाली निघेपर्यंत किंवा ते पुन्हा निवडून येईपर्यंत मंत्रिपदासारखी लाभाची राजकीय पदे देऊ नयेत, अशीही मागणी आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयातून पक्षांतरबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, राजीनाम्यांच्या राजकीय वापरावर नियंत्रण आणि सत्तांतराच्या प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण घटनात्मक दिशा मिळण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!