काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा इशारा; प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरणार
Amravati मेळघाटच्या समृद्ध वनसंपदेवर परिणाम करणारा अदाणी समूहाचा प्रस्तावित आडनदी जलविद्युत प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. विकासाच्या नावाखाली जंगल, वन्यजीव आणि आदिवासींच्या नैसर्गिक हक्कांचा बळी देऊन खासगी उद्योगसमूहाचे हित साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे. शासनाने या प्रकल्पाबाबत आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी; अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
चिखलदरा तालुक्यातील आडनदी परिसरात १,५०० मेगावॅट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी आडनदी, भांडरी आणि जामली परिसरातील सुमारे २४०.६१ हेक्टर जमीन प्रस्तावित असल्याची माहिती आहे. हा परिसर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राशी संबंधित असल्याने येथे होणारी संभाव्य वृक्षतोड, वन्यजीवांच्या संचारमार्गांवर होणारा परिणाम आणि जैवविविधतेचे नुकसान गंभीर ठरू शकते, अशी चिंता देशमुख यांनी व्यक्त केली.
अकोल्यात पाणी टंचाई, मग स्विमिंग पूलच्या घश्यात टँकरने पाणी कशासाठी?
अमरावतीच्या वाट्याला पर्यावरणाला बाधा पोहोचविणारे प्रकल्पच का?
अमरावती जिल्ह्यात यापूर्वी अदाणी समूहाच्या सिमेंट प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आला होता. आता मेळघाटच्या वनसंपदेवर परिणाम करणारा जलविद्युत प्रकल्प पुढे आणला जात आहे. पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्पच का दिले जातात, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.
या भागात ऑटोमोबाईलसारखे रोजगारनिर्मितीला चालना देणारे उद्योग आणण्याऐवजी पर्यावरणाला बाधा पोहोचविणारे प्रकल्प लादले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमरावती एमआयडीसीमध्ये यापूर्वी औष्णिक वीज प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जागा देण्याचा प्रयत्न झाला होता. अशा प्रकल्पांमुळे स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणी आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी करणारे निर्णय घेऊ नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ग्रामसभांची संमती आणि वनहक्कांचे संरक्षण करा
आडनदी प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीचे प्रमाण, वन्यजीवांच्या अधिवासावरील परिणाम आणि पर्यावरणीय हानी यांचे स्वतंत्र मूल्यांकन करून ते सार्वजनिक करावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील वन्यजीवांच्या संचारमार्गांचा सविस्तर अभ्यास करावा. स्थानिक आदिवासींच्या ग्रामसभांची संमती आणि त्यांच्या पारंपरिक वनहक्कांचे संरक्षण सुनिश्चित करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, प्रकल्पातून किती रोजगारनिर्मिती होणार आहे, याचा सविस्तर तपशील जाहीर करावा आणि स्थानिक युवकांना रोजगार देण्याची लेखी हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शासनाने या प्रकल्पाबाबत तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. अन्यथा काँग्रेसच्या वतीने प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला.








