डिलिमिटेशन विधेयकावर भाजपला साथ देण्याच्या चर्चेने महाविकास आघाडीत नाराजी
Nagpur : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकाच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे. पवार कुटुंबीयांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करताना, सत्ता मिळवणे हाच पवारांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असल्याची जहाल टीका त्यांनी केली. शनिवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी पवारांच्या राजकीय वाटचालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता असल्याचे कारण काँग्रेस नेतृत्वाला कळवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या विधेयकावर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांचा राजकीय इतिहास पाहिला तर अनेकदा पाठीत खंजीर खुपसल्याचे प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला त्यांचा हा इतिहास माहीत आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे पवार भाजपसारख्या शक्तींशी हातमिळवणी करतील, असे कधी वाटले नव्हते; मात्र सध्याची भूमिका निराशाजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरींचा ‘नो वेस्टेज’ जलमंत्र; प्रत्येक थेंब ठरणार शेतीचा तारणहार!
शरद पवार यांना वयाच्या ८५व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले होते. त्यांच्या माध्यमातून फुले- शाहू – आंबेडकर यांचा पुरोगामी विचार संसदेत प्रभावीपणे मांडला जावा, ही त्यामागची भूमिका होती. मात्र आता त्याच विचारांना तिलांजली देण्याचे काम पवार करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. डिलिमिटेशनच्या माध्यमातून देशातील लोकशाही आणि संविधानापुढे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, या पक्षासाठी सत्तेशिवाय राजकारण करणे शक्य नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. पक्षाकडे ठोस वैचारिक भूमिका नसून सत्तेची समीकरणे जुळवणे हाच उद्देश असल्याचा त्यांचा आरोप आहे. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरही त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली. केवळ दहा आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करणे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. भाजपने अधिक आमदार असलेल्या एकनाथ शिंदे गटाला मुख्यमंत्रिपद दिले नाही, मग सुप्रिया सुळे यांना कोणत्या आधारावर संधी देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पक्षफुटीच्या भीतीमुळे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेवरही वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय पक्षातील सर्वांशी चर्चा करून नव्हे, तर घरात बसून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. ‘सत्तेसाठी जगायचे आणि सत्ता घेऊनच मरायचे, एवढेच पवारांच्या डोक्यात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकावरील राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आणि त्याचे महाविकास आघाडीतील राजकीय परिणाम याकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वडेट्टीवारांच्या या आक्रमक टीकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.








