व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी स्वतंत्र शेतकरी आयोगाच्या स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी स्वतंत्र शेतकरी आयोगाच्या स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार

नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या शेतीला ॲग्रोव्हिजनमधून नवी दिशा दिल्याचे सांगत केले उपक्रमाचे कौतुक

Nagpur – शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींना सक्षम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्यात स्वतंत्र शेतकरी आयोगाची स्थापना होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी मी आगामी काळात विधानसभेत ठामपणे विषय मांडणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण व्हावी, हा या मागणीमागील प्रामाणिक उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण प्रयत्नाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभावेत, अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ॲग्रोव्हिजनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नितीन गडकरी यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, वित्त व कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विविध लोकप्रतिनिधी, कृषी तज्ज्ञ, ॲग्रोव्हिजनची संपूर्ण टीम आणि पदाधिकारी उपस्थित होते.

१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर विदर्भाच्या शेतीविषयी अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये ‘विदर्भाची शेती, पिकवी हिरे-मोती’ आणि वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड, असे म्हटले जायचे. मात्र, या सामर्थ्याचे शेतकऱ्यांच्या जीवनातील समृद्धीत रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली कृती अनेक वर्षे अपुरी राहिली. त्याचे गंभीर परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागले. वर्धा, यवतमाळसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले. अशा परिस्थितीत गेल्या १७ वर्षांपासून ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून विदर्भाच्या शेतीला नवी दिशा देण्याचे काम नितीन गडकरी करीत आहेत. विदर्भाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या या कार्याचा मनापासून अभिमान वाटतो, असे मुनगंटीवार म्हणाले.

विशेष सभा तहकूब केल्याने नेत्याचा संताप, पक्ष कार्यालयात घेतला नगरसेवकांचा ‘क्लास’!

निवडणुका जिंकण्याच्या पॅटर्नपेक्षा पाणी अडविण्याच्या पॅटर्नला गडकरी यांनी अधिक महत्त्व दिले. नितीन गडकरी यांना केवळ ‘रोडकरी’ आणि ‘पुलकरी’ म्हणून ओळखणे पुरेसे नाही. ते ‘सेवाकरी’, ‘पाणीकरी’ आणि कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम करणारे नेतृत्व आहेत. सामान्यतः लोक धनावर प्रेम करतात; मात्र नितीनजी पाण्यावर प्रेम करतात. भविष्याचा वेध घेत ते विदर्भाच्या नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भूमीसाठी आधुनिक भगीरथ म्हणून काम करीत आहेत, अशा शब्दांत त्यांनी गडकरींचा गौरव केला.

जगाची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील अन्नधान्याची गरज पाहता शेती हे भारतासाठी मोठे संधीचे क्षेत्र आहे. आपण इतर व्यवसाय आणि उद्योगांसाठी ज्या प्रमाणात लक्ष देतो, त्या तुलनेत शेतीसाठी पुरेसे लक्ष दिले जात नाही. मी राज्याचा अर्थमंत्री असताना कृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंना तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आग्रही सूचना केली होती. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली होती. कारण महाराष्ट्राच्या तिजोरीवर सर्वांत पहिला हक्क मातीची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे येत आहेत, शेतकऱ्यांना मदत करा; मनसेचा प्रशासनाला इशारा

ॲग्रोव्हिजन हे केवळ प्रदर्शन नाही. हा शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारा आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणारा उपक्रम आहे. यातून मतांचे राजकारण होत नाही, तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचे काम होते. राजकीय लाभाचा विचार न करता सातत्याने शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नितीन गडकरी यांचे मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याच्या दिशेने राज्यात आणि देशात व्यापक प्रयत्न व्हावेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारी भक्कम व्यवस्था उभी राहावी, हीच आपली भूमिका असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

error: Content is protected !!