लोकसभेत अजून ७ मतांची गरज, विरोधकांच्या गोटात फूट पाडण्याची रणनीती?
New Delhi : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण या दोन महत्त्वाच्या विधेयकांवरून केंद्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार या विधेयकांना मंजुरी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे चित्र आहे. मात्र, लोकसभेत आवश्यक बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सरकारला अद्याप सात मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीएने विरोधी पक्षांतील काही घटकांना सोबत घेण्याची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एप्रिल २०२६ मध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावेळी विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत सरकारचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ वाढल्याचा दावा केला जात आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील कथित बंडखोरी आणि महाराष्ट्रात शिवसेनेतील राजकीय घडामोडींमुळे एनडीएला काही खासदारांचा अतिरिक्त पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
सत्ता हेच अंतिम ध्येय; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघात
उपलब्ध आकडेवारीनुसार, लोकसभेत सध्या ५४० सदस्य असून तीन जागा रिक्त आहेत. सर्व सदस्यांनी मतदान केल्यास दोन तृतीयांश बहुमतासाठी ३६० मतांची आवश्यकता असेल. एनडीएकडे सध्या ३२० खासदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत सरकारला आणखी ४० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मात्र, काही विरोधी पक्षांची अनुकूल भूमिका आणि मतदानातील अनुपस्थिती यामुळे हे गणित बदलू शकते.
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आठ, द्रमुकची २२ आणि वायएसआर काँग्रेसची चार मते सरकारच्या बाजूने पडल्यास एनडीएचे समर्थक संख्याबळ ३५४ पर्यंत पोहोचू शकते. तरीही बहुमतासाठी सात मतांची आवश्यकता राहणार आहे. अशावेळी विरोधी पक्षांतील दहा खासदार मतदानावेळी अनुपस्थित राहिल्यास आवश्यक बहुमताचा आकडा कमी होऊ शकतो. हीच शक्यता सरकारसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते.
राज्यसभेत एकूण २४४ जागांपैकी एक जागा रिक्त असल्याने दोन तृतीयांश बहुमतासाठी १६३ मतांची गरज असल्याचे गणित मांडले जात आहे. एनडीएकडे १५४ खासदार असल्याने आणखी नऊ मतांची आवश्यकता आहे. बीजू जनता दलाचे पाच आणि वायएसआर काँग्रेसचे चार खासदार यांचा पाठिंबा मिळाल्यास हा आकडा गाठणे शक्य होऊ शकते. दुसरीकडे, द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळेही सरकारच्या संख्याबळात बदल होऊ शकतो.
गडकरींचा ‘नो वेस्टेज’ जलमंत्र; प्रत्येक थेंब ठरणार शेतीचा तारणहार!
विशेष म्हणजे, यापूर्वी या विधेयकासंदर्भात काही अटी आणि शर्ती मांडणाऱ्या पक्षांची भूमिका आता बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात कोणता पक्ष कोणाच्या बाजूने उभा राहणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. विरोधकांची एकजूट कायम राहते की सत्ताधारी पक्ष बहुमताचे गणित जुळवण्यात यशस्वी होतो, याचा फैसला संसदेतील मतदानातूनच होणार आहे.








