The government is harassing the affected farmers : सिंचनाखालील क्षेत्राचे उंबरठा उत्पन्न कमी दाखवले
Buldhana खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ३ वरील कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वसंतनगर व भरोसा येथील तब्बल ३१५ एकर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानाचे मूल्यांकन करताना शेतकऱ्यांसोबत अन्याय झाल्याचा आरोप केला जात आहे. योग्य पंचनाम्याऐवजी उंबरठा उत्पन्न कमी दर्शवून व १००% नुकसान होऊनही अत्यल्प भरपाई देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा १ ते ४ मधील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सातत्याने समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर कालवा क्रमांक तीनवरील नुकसानाबाबत खडकपूर्णा कालवे उपविभाग क्र. २, चिखली यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पंचनाम्यासाठी पत्र दिले होते.
कालव्याच्या गळतीमुळे ३१५ एकर शेतीतील रब्बी पिके वाया गेली, हे खुद्द खडकपूर्णा कालवे विभागाने मान्य केले आहे. मात्र, पंचनाम्यात ३०० एकरवरील नुकसानग्रस्त ३१ शेतकऱ्यांना केवळ ४.३५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कालव्याचे पाणी मिळणाऱ्या जमीनींचे उंबरठा उत्पन्न मुद्दाम कमी दाखवण्यात आले आहे, तर ज्या ठिकाणी कालव्याचे पाणी नाही, तिथे उंबरठा उत्पन्न जास्त दाखवण्यात आले आहे.
Vidarbha Farmers : शेतकरी कर्जमाफी कधी? ५२ हजार शेतकऱ्यांचे खाते एनपीए
यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अत्यंत कमी मिळणार आहे. या अन्यायाविरोधात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी २ एप्रिल रोजी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तसेच, वाढीव नुकसानभरपाई, निकृष्ट कालव्याची पुनर्बांधणी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा नुकसानीला आळा बसावा, यासाठी तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाकडून तातडीने निर्णय न घेतल्यास शेतकरी मोठ्या आंदोलनाचा इशारा देत आहेत.








