Amol Mitkari Says, “If Ajit Dada Been Alive, Drought Would Have Been Declared in Maharashtra by Now” : पावसाच्या खंडामुळे सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी संकटात; सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, माजी आमदारांची मागणी
Akola महाराष्ट्रावर सध्या कोरड्या दुष्काळाचे सावट असून विदर्भ, विशेषतः पश्चिम विदर्भातील खरीप पिकांची परिस्थिती गंभीर झाली आहे. पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर यांसह अन्य पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
मिटकरी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा संदर्भ देत, “अजितदादा आज हयात असते तर आतापर्यंत महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर झाला असता,” असे मत व्यक्त केले. पावसातील तूट, पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेऊन अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेतला असता, असेही त्यांनी सांगितले.
कागदी पाहणी नको, शेतकऱ्यांना थेट मदत द्या
अकोला जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत पावसाची तूट जाणवत असून खरीप हंगाम अडचणीत आला आहे. अकोला जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ५० मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.
सध्या कृषिमंत्री राज्याच्या विविध भागांचा दौरा करून पीक परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र केवळ पाहणी आणि अहवालांपुरते न थांबता सरकारने प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली.
Sanjay Raut : ‘दुष्काळाच्या बैठका स्टेडियमवर घ्या आणि लोकांना कळू द्या’; संजय राऊतांचा टोला
मंत्रिमंडळाकडून निर्णयाची अपेक्षा
सोयाबीन व कापूस उत्पादकांसह संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा, नुकसानभरपाई, चारा व पाण्याची व्यवस्था याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मिटकरी म्हणाले. राज्य सरकारने वेळ न घालवता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.








