७५ वर्षांची अट काढल्याचा फडणवीसांचा दाखला; अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Amravati भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एका स्थानिक नेत्याने आपल्याला राजकारणातून निवृत्त होऊन घरी बसण्याचा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट बोंडे यांनी केला. विशेष म्हणजे, या नेत्याचा उल्लेख त्यांनी ‘लहान भाऊ’ असा केला; मात्र त्याचे नाव घेणे जाणीवपूर्वक टाळले.
दिवाळीच्या काळात एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. बोंडे यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला. आपले वय झाले असून आता घरी बसून आशीर्वाद द्यावेत, असा सल्ला लहान भावाने दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या सल्ल्याला आपण फारसे महत्त्व दिले नसल्याचे त्यांच्या पुढील विधानातून स्पष्ट झाले.
मिनी मंत्रालयासाठी अकोल्यात राजकीय हालचालींना वेग, वंचितला रोखण्यासाठी विरोधकांची रणनीती
गतवर्षी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी आपण आता काय करावे, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावर फडणवीस यांनी ७५ वर्षांच्या वयोमर्यादेची अट काढून टाकल्याचे सांगत काम सुरूच ठेवण्याचा सल्ला दिल्याचे बोंडे यांनी नमूद केले. त्यामुळे कुणाचे ऐकावे, असा प्रश्न असला तरी आपण देवेंद्र फडणवीस यांचेच ऐकण्याचे ठरविल्याचे सांगत त्यांनी ‘लहान भावाच्या’ सल्ल्याला अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले.
१२५ जिल्ह्यांत नक्षलवादाचा विळखा, तत्कालीन सरकारे गप्प का होती?
डॉ. बोंडे यांनी संबंधित नेत्याचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. दिवाळीदरम्यान एका वृत्तवाहिनीवर अमरावतीतील नेमक्या कोणत्या नेत्याची मुलाखत झाली होती, याची चर्चा आता या विधानाशी जोडली जात आहे. त्यामुळे बोंडे यांच्या ‘लहान भावाचा’ रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत अमरावतीच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.








