व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती

संघटनात्मक तयारीला वेग, ११ जणांवर जबाबदारी

Amravati: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विशेष निवडणूक समिती गठीत केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या समितीची घोषणा करण्यात आली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक तयारी, निवडणुकीचे नियोजन आणि संबंधित राजकीय व संघटनात्मक बाबींवर काम करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारांशी संपर्क आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

या समितीत काँग्रेसच्या केंद्रीय कार्यसमितीच्या सदस्य तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि वसंतराव पुरके यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली आहे.
समितीत आमदार अमित झनक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार साजिद खान पठाण, आमदार अनिल मांगुळकर आणि आमदार धीरज लिंगाडे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी महापौर विलास इंगोले आणि स्वाती वाकेकर हे समितीचे सदस्य असतील.

‘यांचा मेंदूच चोरीला गेला’ फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

एकूण ११ सदस्यांच्या या समितीच्या माध्यमातून अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेचे नियोजन केले जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेते, विद्यमान आमदार तसेच माजी लोकप्रतिनिधींना एकत्रितपणे जबाबदारी देत काँग्रेसने निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी सुरू केल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट झाले आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राजा उदार झाला, हाती भोपळा दिला

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या दृष्टीने बैठका, संघटनात्मक नियोजन आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील आगामी राजकीय घडामोडींकडे शिक्षक मतदारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!