व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण लोकसभेसाठी अडीच वर्षे आधीच मोर्चेबांधणी संभाव्य उमेदवाराची मतदारसंघात सक्रियता!

लोकसभेसाठी अडीच वर्षे आधीच मोर्चेबांधणी संभाव्य उमेदवाराची मतदारसंघात सक्रियता!

सामाजिक उपक्रमांची व्याप्ती; परिवार मिलन सोहळ्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Wani : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक अद्याप अडीच वर्षांवर असली, तरी लोकसभा मतदारसंघात आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. आगामी निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार, पक्ष कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवणार आणि सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव कशी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, काही संभाव्य इच्छुकांनी अधिकृत निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात आपली उपस्थिती ठळक करण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच एका आमदाराच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लोकसभा मतदारसंघात तब्बल ३४ ठिकाणी महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. एका वाढदिवसाच्या निमित्ताने इतक्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होत आहे. रक्तदानासारख्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध भागांतील नागरिकांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न भविष्यातील राजकीय तयारीचा भाग आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उद्धव ठाकरे मौन सोडा, स्वा. सावरकरांच्या अपमानावर भूमिका स्पष्ट करा

यापूर्वी घुग्घुस येथे आयोजित करण्यात आलेल्या परिवार मिलन सोहळ्यानेही राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता ३४ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन झाल्याने संबंधित नेत्याच्या मतदारसंघातील वाढत्या सक्रियतेची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. विशेष म्हणजे, वणी विधानसभा क्षेत्राशी थेट राजकीय संबंध नसतानाही या भागात वाढविण्यात येत असलेला संपर्क अनेकांच्या नजरेत भरत आहे.

लोकसभा मतदारसंघातील मागील निवडणुकीचे निकाल पाहता सामाजिक समीकरणांचे महत्त्वही दुर्लक्षित करता येणार नाही. या निकालामागे कुणबी समाजाची एकजूट महत्त्वाची ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही स्थानिक पातळीवरील सामाजिक समीकरणांचा प्रभाव दिसून आला.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना राजकीय पक्षांना केवळ पक्षनिष्ठा किंवा वैयक्तिक लोकप्रियतेवर अवलंबून राहता येणार नाही. सामाजिक प्रतिनिधित्व, स्थानिक स्वीकारार्हता आणि विविध समाजघटकांशी असलेले संपर्क हे घटकही निर्णायक ठरू शकतात.

इवली-गडचिरोली महामार्गासाठी ४५.७९ कोटींचा निधी मंजूर

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांच्या हालचाली, सामाजिक संघटनांशी वाढता संपर्क आणि मतदारसंघात आयोजित होणारे विविध कार्यक्रम यांना राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारीचे चित्र स्पष्ट नसले, तरी संभाव्य दावेदारांनी आपापल्या परीने जनसंपर्काचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीचे रणशिंग वाजण्यास अजून अवकाश असला, तरी राजकीय पटावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या सामाजिक उपक्रमांचे रूपांतर आगामी काळात लोकसभेच्या उमेदवारीच्या दाव्यात होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

error: Content is protected !!