bjp-announces-11-candidates-for-maharashtra-legislative-council-prajakt-tanpure-arun-lakhani : भाजपची विधान परिषदेसाठी ११ उमेदवारांची घोषणा
Mumbai : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ११ उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली असून राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी भाजपने अनुभवी तसेच संघटनात्मक पातळीवर प्रभावी मानल्या जाणाऱ्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या यादीत अमरावतीमधून प्रवीण पोटे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघातून बसवराज पाटील, जळगावमधून नंदकिशोर महाजन, नागपूरमधून राजीव पोतदार आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अहिल्यानगर मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीची विशेष चर्चा सुरू आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये असलेले तनपुरे यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देत राजकीय पुनर्वसनाची संधी दिल्याचे मानले जात आहे.
Legislative election : सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस; पोटे-देशमुखांच्या लढतीकडे लक्ष
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले अरुण लखानी हे देखील सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे म्हणून त्यांचे नाव अलीकडच्या काळात चर्चेत आले. भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत महत्त्वाच्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाचाही अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला आहे. विधान परिषद निवडणुकीतील एकूण १७ जागांपैकी भाजप ११ जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला ४ जागा मिळाल्या असून ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण अशा दोन जागा देण्यात आल्या आहेत.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे. २५ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून २ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून निश्चित करण्यात आली आहे. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
Grampanchayat election : ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत वाढणार; सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
महायुतीतील जागावाटप आणि भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक यंदा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध विभागांतील राजकीय समीकरणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि महायुतीतील समन्वय यांची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.








