Cases registered against six people in Buldhana : पोलिसांच्या तावडीतून ‘बनावट’ मतदार पळवला; तीन प्रभागांतील व्हिडिओ व्हायरल
Buldhana महिनाभर आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान बोगस मतदारांचा सुळसुळाट उघड झाल्याने शहरात खळबळ माजली. सलग तीन प्रभागात संशयित मतदार पकडले गेले, तर एका ठिकाणी आरोपीला पोलिसांच्या तावडीतून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सर्व घटनांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच राजकीय वातावरण तापले आहे.
प्रभाग क्र. ६ : बनावट ओळखपत्रासह मतदार पकडला, पण उमेदवाराच्या नातेवाईकांनी ‘पळवला’
जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र (डीव्हीटीसी) येथील मतदान केंद्राबाहेर स्थानिक नागरिकांनी एका संशयित व्यक्तीकडील बनावट ओळखपत्र उघडकीस आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यायला सुरुवात करताच त्या प्रभागातील एका उमेदवाराने व त्याच्या नातेवाइकाने त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे.
यामुळे प्रभाग ६ मध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Bogus voting : बुलढाण्यात बोगस मतदान कांड! आमदारपुत्रावर कारवाईची विरोधकांची मागणी
प्रभाग क्र. १५ : कोथळीहून आलेले दोन संशयित मतदार पकडले
गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर दोन संशयित व्यक्तींना स्थानिकांनी रोखून धरले. प्राथमिक पडताळणीत त्यांची ओळख संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व एसडीओ शरद पाटील यांनी दिली.
दोन्ही प्रकरणांत पुढील तपास सुरू असून कायदेशीर कारवाई सुरू झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप — “घाटाखालून दोन गाड्या भरून बोगस मतदार आणले”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर थेट आरोप करत म्हटले—
“घाटाखालून दोन गाड्या भरून बोगस मतदार आणले. काहींनी दुसऱ्याच्या नावाने मतदानाचाही प्रयत्न केला.”
त्यांनी कठोर कारवाईची मागणी करत सत्ताधारी पक्षावर गुंडशाहीचा आरोप केला.
प्रभाग क्र. ४ : उर्दू हायस्कूल केंद्रावर गोंधळ, पोलिसांनी सौम्य बळाचा वापर
प्रभाग ४ मधील उर्दू हायस्कूल मतदान केंद्रावरही बोगस मतदान सुरू असल्याच्या चर्चेने वातावरण ढवळून निघाले. नागरिकांची गर्दी वाढताच पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती शांत केली.नंतर येथे सुरक्षा वाढवण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
Rohini Commission : राज्यातील मायक्रो ओबीसीवरील अन्याय थांबवा
बोगस मतदाराला पळविण्याच्या प्रकरणी कुणाल गायकवाड, श्रीकांत गायकवाड आणि संबंधित बोगस मतदाराविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. प्रभाग १५ मधील घटनेत मंगेश ताठे व अन्य दोघांसह एकूण सहा जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी म्हटले “बोगस मतदानाचा प्रयत्न हा एक वर्षांच्या शिक्षेस पात्र गुन्हा आहे. निवडणुकीची शुचिता धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच.”








