BJP to compromise in Amravati legislative election for unopposed : अमरावतीची जागा ‘बिनविरोध’ करण्यासाठी महायुतीची मोर्चेबांधणी
Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीकडे तब्बल ७५ टक्के मतदानाचे स्पष्ट संख्याबळ असल्याचा दावा करत, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सर्वपक्षीय चर्चेच्या माध्यमातून राजकीय समन्वय साधण्याचे संकेत दिले.
देश आणि राज्यासमोरील सध्याची आव्हाने लक्षात घेता, निवडणुकीतील अनावश्यक खर्च, राजकीय कटुता आणि वेळेची नासाडी टाळण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचा पर्याय योग्य ठरू शकतो, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपूर आणि अमरावती या दोन्ही विधान परिषद जागांवर महायुती मजबूत स्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक ही स्थानिक सत्तासमीकरणे ठरवणारी महत्त्वाची निवडणूक मानली जाते. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद सदस्य या निवडणुकीतील मतदार असल्याने सर्वच पक्षांकडून मोठी राजकीय ताकद लावली जाते.
महायुतीकडे स्पष्ट बहुमताचे संख्याबळ असतानाही, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी पक्षांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. केवळ नागपूर आणि अमरावतीच नव्हे, तर राज्यातील इतर संभाव्य जागांवरही असा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
Water crisis : पाण्यासाठी वडनेर भोलजीकरांचा टाहो; ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा
विरोधी पक्षांशी सर्वपक्षीय चर्चा
जागावाटप किंवा तडजोडीच्या पर्यायांवर विचार
पक्षांतर्गत समन्वय आणि देवाण-घेवाणीचे सूत्र
महायुतीच्या उच्चस्तरीय समन्वय समितीकडून अंतिम निर्णय
विदर्भाच्या राजकारणासाठी महत्त्वाची निवडणूक
नागपूर आणि अमरावती या दोन्ही विधान परिषद जागा विदर्भाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या आधारावर या निवडणुकांचे राजकीय परिणाम दूरगामी ठरण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत बावनकुळे यांनी मांडलेल्या ‘बिनविरोध’ प्रस्तावाला विरोधकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण विदर्भाचे राजकीय लक्ष लागले आहे. सर्वच पक्ष सलोख्याचे राजकारण करत सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.








