Officials failing to stay at their headquarters will be checked by police hereafter, warns Guardian Minister Chandrashekhar Bawankule : अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारींची दखल; पोलिसांकडून तपासणी करण्याचा इशारा
Amravati महावितरणचे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, कास्तकारांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करतात, शेतातील ट्रान्सफॉर्मर उघडे पडले आहेत, तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत, अशा तक्रारींची लांबलचक यादीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावत, मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले.
महावितरणच्या लाइनमनकडून अप्रशिक्षित कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जात असल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या. अशा कर्मचाऱ्यांना विद्युत कामाचा पुरेसा अनुभव व प्रशिक्षण नसल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
‘याद राखा, हे सीएमच्या मामांचं गाव आहे,’ असा सज्जड दम देत त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम सुरू असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला.
पालकमंत्री बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम घेतला. यावेळी त्यांनी शेकडो नागरिकांच्या समस्या व गाऱ्हाणी ऐकून घेतली. त्यानंतर बँक अधिकारी, महावितरण मंडळाचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, खासदार आणि आमदार उपस्थित होते.
रोहन राठोड मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाईचे आदेश
नांदगाव पेठ येथील रोहन राठोड हा १ ऑगस्ट रोजी विद्युत खांबावर चढून वेली व फांद्या काढत असताना विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी महावितरणची जबाबदारी निश्चित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रोहनचे वडील विठ्ठल राठोड यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
यावेळी बावनकुळे यांनी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे तत्काळ आदेश दिले. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी
महावितरणचे अनेक अधिकारी त्यांच्या नियुक्त मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यापुढे अशा अधिकाऱ्यांची माहिती पोलिसांकडून मागवून घेऊन तपासणी केली जाईल, असा इशाराही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिला. अधिकारी मुख्यालयी राहून नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.








