Shivsena stages farmers’ protest march in Washim, demands declaration of drought : ५ ऑक्टोबरपर्यंत सरसकट ५० हजारांची मदत न मिळाल्यास समृद्धी महामार्ग बंद पाडण्याचा आमदार नितीन देशमुखांचा इशारा
Washim पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा आता रस्त्यावर आला आहे. जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत शेतकरी आक्रोश मोर्चे काढण्यात येणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात २१ सप्टेंबर रोजी वाशिम येथून झाली.
शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, डॉ. सिद्धार्थ देवळे, सुधीर कवर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
वाशिमसह अकोला, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पावसाची दडी; खरीप पिके संकटात
पश्चिम विदर्भात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनसह अन्य खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. काही भागांत पिके पूर्णतः सुकली असून, शेतकऱ्यांसमोर नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी करण्यात आली.
Uddhav Balasaheb Thackeray : दुष्काळ जाहीर करा; अन्यथा ५ ऑक्टोबरपासून समृद्धी महामार्ग बंद करू
‘अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू!’
आंदोलनादरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी सरकारवर टीका केली. येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची आर्थिक मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन समृद्धी महामार्ग बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला.
फोटो ओळ : बैलबंडीत बसून शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी झालेले आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे यांच्यासह उद्धवसेनेचे पदाधिकारी डॉ. सिद्धार्थ देवळे, सुधीर कवर आदी.








