BJP in the lead; Mahayutis dominance continues : भाजप आघाडीवर; महायुतीचे वर्चस्व कायम
Mumbai: महाराष्ट्रातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून राज्याच्या स्थानिक राजकारणात मोठे चित्र स्पष्ट झाले आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने आपले वर्चस्व राखले असून भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही राज्याच्या विविध भागांत लक्षणीय यश मिळवले आहे. महाविकास आघाडीला मात्र काही मोजक्याच ठिकाणी समाधान मानावे लागले आहे.
आज सकाळी १० वाजल्यापासून राज्यभर मतमोजणीला सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात भाजपने आपली पकड मजबूत ठेवली असून कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शिंदे गट आणि अजित पवार गट प्रभावी ठरले आहेत. थेट नगराध्यक्ष निवडीमुळे निवडणूक अधिक चुरशीची झाली होती आणि अनेक ठिकाणी अत्यल्प मतांनी विजय- पराजय ठरला.
Local body elections: अमरावतीत वंचित बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री!
जाहीर झालेल्या निकालांनुसार वाई नगरपरिषदेत भाजपचे अनिल सावंत, जिंतूरमध्ये भाजपचे प्रताप देशमुख तर पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उत्तम घरत नगराध्यक्ष झाले आहेत. तासगावमध्ये स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील यांनी बाजी मारली असून जेजुरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. उरुण इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे नगराध्यक्ष झाले आहेत.
इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भरत शाह, मैंदर्गीत भाजपच्या अंजली बाजारमठ, मालवणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या ममता वराडकर तर पाचगणीमध्ये अजित पवार गट पुरस्कृत दिलीप बगाडे विजयी झाले आहेत. सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले, कणकवलीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर तर गेवराईत भाजपच्या गीता पवार नगराध्यक्ष झाल्या आहेत.
Anil Deshmukh : शरद पवारांच्या नेत्याचा निर्णय योग्य ठरला, काटोलमध्ये शेकापच्या नगराध्यक्ष
भोरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामचंद्र आवारे, गंगाखेडमध्ये उर्मिला केंद्रे, देवळाली प्रवरा, अक्कलकोट, धामणगाव, पेण, सासवड, मंगळवेढा आणि तुळजापूर येथे भाजपने नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला आहे. विटा, चिपळूण, खेड, पैठण, सिल्लोड, माथेरान, बुलढाणा, चाकण, मोहोळ, जुन्नर, राजगुरुनगर, मंचर, रत्नागिरी आणि लांजा येथे शिवसेना शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे.
राजापूरमध्ये काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे, धर्माबाद आणि बिलोलीत मराठवाडा जनहित पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. डहाणू, खोपोली येथेही शिंदे गटाला यश मिळाले असून वैजापूर, अंबरनाथ, अंबड, तेल्हारा, देसाईगंज, निलंगा आणि आळंदी येथे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. दौंड, शिरूर, लोणावळा, कर्जत, उरुळी फुरसुंगी, माळेगाव आणि महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने सत्ता मिळवली आहे. श्रीवर्धनमध्ये शिवसेना ठाकरे गट, कन्नड आणि खुलताबादमध्ये काँग्रेस तर संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समितीचा विजय झाला आहे.
Shyamkumar barve : काँग्रेसच्या खासदाराला ‘घरचा’ आहेर, स्वतःचीच नगरपंचायत गमावली
एकूणच या निकालांमधून महायुतीची ताकद पुन्हा अधोरेखित झाली असून भाजप हा राज्यातील सर्वात प्रभावी पक्ष म्हणून पुढे आला आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा असताना, विरोधकांसाठी हे निकाल आत्मपरीक्षणाची गरज निर्माण करणारे ठरले आहेत.
__








