delhi-lathicharge-row-supriya-sule-anna-hazare-aiims-doctors-react : दिल्ली लाठीचार्जवरून राजकीय व सामाजिक वर्तुळात संताप
Delhi: दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि एम्स निवासी डॉक्टर संघटना आदींनी या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, निष्पक्ष चौकशी करावी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेत अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
“लोकांचा आवाज दडपण्याऐवजी ऐका” – सुप्रिया सुळे :
या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटले की, जंतर-मंतर येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक असून आंदोलक हे गुन्हेगार नव्हते, तर आपल्या भविष्याची चिंता व्यक्त करणारे विद्यार्थी होते.
Sansad March Violent : दिल्लीतील ‘संसद मार्च’ हिंसक; ७८ आंदोलक ताब्यात
सुळे म्हणाल्या की, “एक भारतीय, लोकप्रतिनिधी आणि आई म्हणून ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपल्याच मुला-मुलींचे प्रतिबिंब दिसते. लोकशाहीवर विश्वास असलेल्या सरकारने लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐकण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला पाहिजे.”
अण्णा हजारे यांची संयमाची भूमिका : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कोणत्याही प्रकारच्या संघर्षाऐवजी संवादालाच प्राधान्य दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “लाठीचार्ज नेमका का झाला, याची मला संपूर्ण माहिती नाही. मात्र कोणताही प्रश्न हिंसेने नव्हे तर सलोख्याने आणि चर्चेतून सोडवता येतो.” हजारे यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
एम्स निवासी डॉक्टर संघटनेचे राष्ट्रपतींना पत्र : दरम्यान, एम्स निवासी डॉक्टर संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पत्रात आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शांततापूर्ण आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण व्हावे, संबंधित गैरप्रकारांवर निष्पक्ष कारवाई व्हावी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपचारांबाबत स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संघटनेने सरकारला लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना अतिरिक्त बळाचा वापर न करता संयम, संवाद आणि पारदर्शकतेने प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.
आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे : दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पुन्हा संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली असून राजधानीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्यांपुरते मर्यादित न राहता राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांच्या सहभागामुळे अधिक व्यापक स्वरूप धारण करत असल्याचे चित्र दिसत आहे.








