Shingne-Kayande group begins political maneuvering in Deulgaon Raja Agricultural Produce Market Committee : सभापतीपदासाठी रंगत; मंगळवारी निवड, कोणाची लागणार वर्णी?
Deulgaoraja देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी येत्या २ जून रोजी निवड प्रक्रिया पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारी, गटबाजी आणि सत्तासमीकरणांच्या चर्चांना उधाण आले असून स्थानिक राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे.
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी २९ मे रोजी बाजार समितीच्या संचालकांशी चर्चा करून त्यांच्या भूमिका जाणून घेतल्याची माहिती समोर येत आहे. सभापती निवडीपूर्वी विविध गटांकडून रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे.
माजी सभापती समाधान शिंगणे यांनी ६ एप्रिल रोजी दिलेला राजीनामा २१ मे रोजी मंजूर झाल्यानंतर बाजार समितीतील सत्तासमीकरणांमध्ये बदल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुढील सभापती कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा प्रभाव राहिल्याचे मानले जाते.
त्यांच्या सूचनेनुसारच समाधान शिंगणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. २५ मे २०२३ रोजी सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर समाधान शिंगणे यांच्या कार्यकाळात बाजार समितीच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजात विविध बदल करण्यात आल्याचे सांगितले जाते.
Chikhli APMC : चिखली बाजार समितीत सभापतीपदासाठी रस्सीखेच; राजकीय हालचालींना वेग
खर्च नियंत्रण, उत्पन्नवाढ, व्यवहारातील पारदर्शकता आणि शेतकरीहिताच्या उपाययोजनांमुळे बाजार समिती सलग दोन आर्थिक वर्षांत नफ्यात आल्याचा दावा केला जात आहे. शेतकऱ्यांसाठी सभागृह, विश्रांतीगृह, पीकविवरण प्रणाली, ऑनलाइन लिलाव व्यवस्था यांसह विविध सुविधा सुरू करण्यात आल्या. तसेच अंढेरा येथे उपबाजार सुरू करण्याचा निर्णय, सीसीआय नोंदणीसाठी कर्मचारी नियुक्ती आणि भविष्यात ई-नाम योजना सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.
सभापतीपदासाठी एल. एम. शिंगणे, डॉ. रामप्रसाद शेळके, नारायण कोल्हे, शंकर शिंगणे, युवा नेतृत्व व माजी सरपंच भरत पहाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे समर्थक गटाकडून माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तर उपसभापतीपदासाठी गणेश डोईफोडे, निवृत्ती नागरे, संध्या देशमुख आणि भगवान खरात हे संभाव्य दावेदार मानले जात आहेत.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीची निवडणूक लढविण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार मनोज कायंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवत विजय मिळवला. बाजार समितीतील बहुतांश संचालक हे आमदार कायंदे यांच्या भूमिकेकडे पाहणारे असल्याने सभापती निवडीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
Headless body found : तपासातील हलगर्जी भोवली; एलसीबी, जळगाव जामोदचे ठाणेदार नियंत्रण कक्षात
दरम्यान, अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भूमिकेवर अवलंबून राहील, अशी चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे. बाजार समितीच्या सत्तासमीकरणात त्यांचा प्रभाव लक्षात घेता सभापतीपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीसमोर आर्थिक अडचणी, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, विकासकामांसाठी निधीचे नियोजन आणि आर्थिक शिस्त निर्माण करण्याचे आव्हान उभे असल्याने नव्या सभापतीसमोर जबाबदाऱ्या मोठ्या असणार आहेत. त्यामुळे हे पद केवळ प्रतिष्ठेचे नसून कामकाजाच्या दृष्टीने आव्हानात्मक मानले जात असल्याची चर्चा आहे.








