व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Headless body found : तपासातील हलगर्जी भोवली; एलसीबी, जळगाव जामोदचे ठाणेदार नियंत्रण...

Headless body found : तपासातील हलगर्जी भोवली; एलसीबी, जळगाव जामोदचे ठाणेदार नियंत्रण कक्षात

Jalgaon Jamod police station officer shifted to the control room : उपनिरीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांचीही बदली; शीर नसलेल्या मृतदेहाचे गुढ कायम

Buldhana जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा परिसरात आढळलेल्या शीर नसलेल्या मृतदेह प्रकरणाला नवे वळण मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासह एक पोलीस उपनिरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांची तात्काळ प्रशासकीय बदली करून त्यांची नियुक्ती बुलढाणा येथील नियंत्रण कक्षात केली आहे. तसेच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी राजुरा शिवारात एका अज्ञात तरुणीचा शीर नसलेला व अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील खकनार पोलीस ठाणे हद्दीतील बेपत्ता तरुणी शिवानी कलमेकर हिच्याशी संबंधित धागेदोरे जोडल्याचे सांगितले होते.

MLA Sajid khan pathan : संघ कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार पठाण यांच्यासह सर्व संशयित निर्दोष

तसेच तपासादरम्यान तिच्या वडिलांना व भावाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती होती. दरम्यान, २८ मे रोजी संबंधित तरुणी जिवंत अवस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर तपास प्रक्रियेबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले. मृतदेहाची ओळख पटविणे, पुराव्यांची पडताळणी आणि तपासाची दिशा याबाबत पोलीस यंत्रणेवर चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, उपनिरीक्षक पंकज सपकाळे तसेच पोलीस अंमलदार एजाज रफिक खान, अमोल रमेश शेजोळ आणि अजीज रेहमान परसुवाले यांची तत्काळ बदली केली आहे.तसेच याच प्रकरणात जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांचीही नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पुढील चौकशीची जबाबदारी खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपास चुकल्यानंतर आता शिर नसलेला मृतदेह कुणाचा याचा तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

error: Content is protected !!