व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Shinde draught review : एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात मोठा ट्विस्ट; गावांमध्ये...

Eknath Shinde draught review : एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात मोठा ट्विस्ट; गावांमध्ये पोहोचता आले नाही, तासन्‌तास वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप

Eknath Shinde unable to reach drought-hit villages in Buldhana due to disruption in schedule : दौरा अडीच ते तीन तास उशिराने; टाकळी, रोहिणखेड आणि खडकी-खामखेडमध्ये पाहणी, तिघ्रा गावातील शेतकरी मात्र प्रतीक्षेतच

Buldhana अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दौऱ्यावर होते. अकोला जिल्ह्यातील दधम आणि व्याळा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील कलोरी, भादोला, खडकी-खामखेड, रोहिणखेड आणि टाकळी येथे त्यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र, दौरा नियोजित वेळेपेक्षा अडीच ते तीन तास उशिराने सुरू झाल्याने वेळापत्रक कोलमडले. परिणामी मोताळा तालुक्यातील तिघ्रा येथे शिंदे यांना पोहोचता आले नाही. त्यामुळे सकाळपासून त्यांच्या भेटीची प्रतीक्षा करणाऱ्या तिघ्रा येथील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी शिंदेंचा संवाद

एकनाथ शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील दधम आणि व्याळा येथे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असून, शेतीवरील खर्चही निघणे कठीण झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

यानंतर शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कलोरी आणि भादोला येथे पाहणी केली. तेथून त्यांचा ताफा मोताळा तालुक्याकडे रवाना झाला. खडकी-खामखेड, रोहिणखेड आणि टाकळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या घरासमोर बेमुदत उपोषणाचा शेतकऱ्यांचा इशारा

‘आत्महत्येचा विचार आला होता…’

अकोला जिल्ह्यातील व्याळा येथे समाधान सुरकर यांनी शिंदे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. सुरकर यांची कान्हेरी गवळी येथे सुमारे पाच एकर शेती असून त्यांनी सोयाबीन आणि तुरीची लागवड केली आहे. मात्र, पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीची परिस्थिती आणि आर्थिक संकटाबाबत बोलताना सुरकर भावुक झाले. परिस्थिती इतकी कठीण झाली होती की मनात आत्महत्येचा विचार आला होता, असे त्यांनी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाल्यानंतर हा विचार मनातून दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिंदे यांनी त्यांना धीर दिला.

तिघ्रा येथील शेतकरी मात्र प्रतीक्षेतच

दरम्यान, शिंदे यांचा दौरा उशिराने सुरू झाल्याने नियोजित वेळापत्रकावर परिणाम झाला. तिघ्रा येथे शिंदे येणार असल्याने शेतकरी सकाळपासून त्यांच्या भेटीची प्रतीक्षा करत होते. बांधावरची परिस्थिती आणि पिकांचे नुकसान थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती.

Eknath Shinde : ‘तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला’; एकनाथ शिंदेंसमोर शेतकऱ्याला अश्रू अनावर

मात्र, वेळेअभावी शिंदे यांना तिघ्रा येथे पोहोचता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. काही शेतकऱ्यांनी दौऱ्याच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.

एकीकडे शिंदे यांनी दौऱ्यात विविध गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर दुसरीकडे दौरा उशिराने सुरू झाल्याने तिघ्रा येथील शेतकऱ्यांना त्यांच्या भेटीपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांच्या व्यथेसोबतच दौऱ्याच्या नियोजनाचा मुद्दाही ऐरणीवर आला.

error: Content is protected !!