Uddhav thackeray Shivsena stages a Drum-Beating Protest for Blanket Loan Waiver; Demonstration Held Outside the Tehsil Office : कर्जमाफीच्या निकषांवर ठाकरे गट आक्रमक; राज्यपालांना निवेदन
Chikhli राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत नवीन निकष लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही अटी-शर्तींशिवाय राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, उपजिल्हाप्रमुख सुरडकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत राज्यपाल विष्णू देव वर्मा यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने सहा महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी नव्याने निकष लावले जात असल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात.
या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मांडलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.








