व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Fire in Amravati: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार; दोषींवर सदोष...

Fire in Amravati: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Health Department responsible for deaths of newborns in Amravati; demand to file culpable homicide cases against those responsible : वंचित बहुजन आघाडीची मागणी; राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करावे

Amravati अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू/एनआयसीयू) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी दोषी अधिकारी, उपकरण पुरवठादार आणि प्रशासकीय जबाबदार व्यक्तींवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

सोमवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटर किंवा विद्युत यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर अन्य बालकांना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढले. काही बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेला राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी कारणीभूत असल्याचा आरोप पातोडे यांनी केला. निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने संबंधित जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Shashikant Shinde : मुख्यमंत्रीच ‘बिग बॉस’ झाल्याने महायुतीत तीव्र नाराजी; शशिकांत शिंदेंचा आरोप, बेरोजगार एल्गार तिरंगा रॅली’ काढण्याची घोषणा

भंडारा दुर्घटनेची पुनरावृत्ती

महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयातील नवजात बालकांच्या विभागाला आग लागण्याची ही पहिली घटना नसल्याचे पातोडे यांनी म्हटले आहे. जानेवारी २०२१ मध्ये भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर चौकशी, अग्निसुरक्षा ऑडिट आणि अन्य उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, पाच वर्षांनंतर अमरावतीत पुन्हा अशीच दुर्घटना घडणे हे आरोग्य व्यवस्थेतील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे त्यांनी म्हटले.

अग्निशमन यंत्रणा, विद्युत सुरक्षा, वैद्यकीय उपकरणांची नियमित तपासणी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत ठोस उपाययोजना झाल्या आहेत का, याची तपासणी होणे आवश्यक आहे. नव्या इमारतीतील विभागातही अशी दुर्घटना घडणे गंभीर बाब असल्याचे पातोडे यांनी म्हटले.

सर्व सरकारी रुग्णालयांचे तातडीने ऑडिट करा

अमरावतीतील घटनेची स्वतंत्र, उच्चस्तरीय आणि पारदर्शक चौकशी करावी. दोषी अधिकारी, उपकरण पुरवठादार आणि प्रशासकीय जबाबदारांवर कारवाई करावी. मृत बालकांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई आणि दीर्घकालीन आर्थिक मदत द्यावी, तसेच जखमी बालकांवर सर्वोत्तम उपचार सुरू ठेवावेत, अशी मागणी पातोडे यांनी केली.

राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील, विशेषतः एसएनसीयू आणि एनआयसीयू विभागांचे तातडीने अग्निसुरक्षा ऑडिट, विद्युत सुरक्षा तपासणी आणि वैद्यकीय उपकरणांची गुणवत्ता तपासणी करावी. या तपासण्यांचे अहवाल सार्वजनिक करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Fire Rages in Amravati : मध्यरात्री अमरावतीत अग्नितांडव!

भंडारा आणि यापूर्वीच्या अशा घटनांनंतर करण्यात आलेल्या शिफारशींची कितपत अंमलबजावणी झाली, याचा अहवाल विधानसभेत सादर करावा. गरीब आणि वंचित कुटुंबांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाचा अर्थसंकल्प, कर्मचारी संख्या आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी ठोस धोरण आखावे, असेही पातोडे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!