मंत्री उईके यांच्या बैठकीनंतर नेत्यांना मिळाला कोणता कानमंत्र?
Gadchiroli : आगामी राजकीय आव्हाने आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी गडचिरोलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश देण्यात आला. मात्र, बैठकीला जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आणि त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे प्रकृतीच्या कारणामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, तर माजी आमदार डॉ. देवराव होळी हे दिल्ली दौऱ्यावर असल्याने अनुपस्थित होते. दोन्ही अनुपस्थितींमागे स्वतंत्र कारणे असली, तरी पक्षांतर्गत राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या अनुपस्थितीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष गेले.
गडचिरोली भाजपमध्ये विविध पातळ्यांवर नेतृत्व, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि स्थानिक राजकारण यावरून मतभेद असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. या पार्श्वभूमीवर डॉ. उईके यांनी पदाधिकाऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. संघटनेची ताकद ही केवळ पदांमध्ये नसून परस्पर समन्वय, संवाद आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्कातून निर्माण होते, असा संदेश बैठकीतून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, सार्वजनिक व्यासपीठावर संघटनात्मक एकजुटीचा संदेश दिला जात असला, तरी पडद्यामागे नेत्यांमधील राजकीय समीकरणे काय आहेत, याची उत्सुकता कायम आहे. स्थानिक पातळीवरील कुरघोड्या, नेतृत्वाची स्पर्धा आणि समर्थकांच्या गटबाजीला आळा घालण्यासाठी डॉ. उईके यांनी बैठकीत काही स्पष्ट सूचना दिल्या का, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.
आगामी काळात पक्षासमोर संघटना विस्तार, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभे करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे या बैठकीतील संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
बंडखोरांनो माघारी फिरा, चर्चा करू; मुख्यमंत्र्यांचे थेट आवाहन
दरम्यान, बैठकीत नेमका कोणता ‘कानमंत्र’ देण्यात आला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी ‘एकत्र या, संघटना मजबूत करा आणि अंतर्गत मतभेदांना बाजूला ठेवा’ हा बैठकीचा गाभा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे डॉ. उईके यांच्या या बैठकीनंतर गडचिरोली भाजपमधील राजकीय समीकरणांना कोणती नवी दिशा मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








