Nitesh Rane raids Matka Adda in Kankavali Sindhudurg district : पोलिसांना सांगूनही दोनच तासांत सुटले आरोपी
Sindhudurg : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल (२२ ऑगस्ट) कणकवलीत एका मटका अड्ड्यावर धाड टाकली. चार महिन्यांपूर्वी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई न झाल्याने शेवटी मीच धाड टाकली, असे राणे यांनी सांगितले. ही धाड पडताच पोलिसही तेथे हजर झाले, कारवाई केली. परंतु केवळ दोनच तासांत आरोपी सुटले. त्यामुळे सर्वच जण बुचकळ्यात पडले.
धाड टाकल्यानंतर राणे यांनी पोलिसांनाही दम दिला. पोलिसांना चार महिन्यांआधी सांगूनसुद्धा महादेव घेवाडे याचा मटका अड्डा सुरू होता. राणेंनी धाड टाकली तेव्हा मटका चालवणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. घेवाडेचा मटका उघडा पडला. धाडीमध्ये मटक्याच्या टेबलांवर चिठ्ठ्या आणि नोटांची बंडल आढळली. गादी, शर्ट आणि पॅंटच्या खिशातही पैसे सापडले. दरम्यान पोलिसही तेथे आले तेव्हा त्यांनाही राणेंनी खडसावले. पण येवढे सगळे होऊनही अटक केलेल्या आरोपींना दोन तासांत जामीन मिळाला.
आमच्या मुलांचे भविष्य खराब करणार असाल तर सामना माझ्याशी आहे. कुणालाही सोडणार नाही. काल मी स्वतः धाड टाकली. याची माहिती कणकवली पोलिस स्टेशनमध्ये चार महिन्यांपूर्वीच दिली होती. तरीही काहीच कारवाई झाली नाही. उलट मी बोलल्यानंतर पोलिसांनी एक लाखाचा हप्ता दोन लाख करून घेतला, असे राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जर मटकेवाल्यांना वाचवले तर पोलिसांनाही सोडणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला. जरी आरोपी दोन तासांत सुटले असले तरी अवैध धंदे करणाऱ्यांचे आणि पोलिसांचेही धाबे या धाडीने दणाणून गेले आहे.
Mumbai police : 364 पोलिसांच्या पदोन्नतीचा आदेश 24 तासांत रद्द
ही कारवाई कशासाठी होती, असा प्रश्न आमच्या आणि जनतेच्या मनात आहे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी म्हटले आहे. आरोपी सुटणार नाहीत, अशी कारवाई प्रशासनाने केली पाहिजे. दोघे आरोपी सुटल्यामुळे शंकेची पाल चुकचुकते आहे. असे धंदे बंद झालेच पाहिजे, ही आमचीही भूमिका आहे. पण अशा गुन्ह्यांतील आरोपी सुटता कामा नये, असे नाईक म्हणाले.








