मतदारांची नावे वगळण्याचे प्रकरण चिघळले, एकतर्फी निर्णय भोवणार
New delhi विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत लाखो मतदारांची नावे घाईघाईने वगळण्याचा वाद आता चांगलाच पेटला असून, दोन सह-निवडणूक आयुक्तांचा स्पष्ट विरोध डावलून एकतर्फी निर्णय घेणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. विरोधी पक्षांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असल्याच्या आरोपांनंतर आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संसदेत महाभियोग आणण्याचे इंडिया’ आघाडीने ठरवले असल्याने त्यांची विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मृत, स्थलांतरित आणि दुबार नावे वगळून अचूक यादी तयार करण्याच्या नावाखाली निवडणूक आयोगाने ही मोहीम हाती घेतली होती. मात्र, महाराष्ट्रात पहिली प्रारूप मतदार यादी जाहीर होताच याचा प्रचंड भडका उडला. एकट्या नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांतून तब्बल ३ लाख मतदारांची नावे गायब करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एकीकडे अनेक मतदारांना यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला, तर दुसरीकडे दुबार नावे, चुकीचे स्पेलिंग आणि मृतांची नावे यादीत जैसे थे ठेवण्यात आल्याने या मोहिमेमागील हेतूवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदार याद्यांमध्ये कोणाला ठेवायचे, कोणाला वगळायचे याचा निर्णय भाजपचे कार्यकर्ते घेत आहेत, याकरिता प्रशासनाने सॉफ्टवेअरचे सूत्र भाजप कार्यकर्त्यांच्या हाती दिले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संपूर्ण प्रकारात निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याने आणि इतर दोन आयुक्तांचा विरोध समोर आल्याने ज्ञानेश कुमार हे मोदी-शहा यांचे मांडलिक म्हणून काम करत असल्याचा थेट आरोप विरोधकांनी केला आहे.
विदर्भासाठी मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर!
या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका मांडली असून, आता त्यांनी संपूर्ण विरोधी पक्षाला एकत्र आणले आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावरील महाभियोगासाठी राहुल गांधी यांनी स्वतः पुढाकार घेत तब्बल १४ प्रमुख विरोधी पक्षांशी चर्चा करून त्यांची सहमती मिळवली आहे. लवकरच दिल्लीत एका संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली जाणार आहे.
दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीसुद्धा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले असून, महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’ आधीपासूनच या भूमिकेशी सहमत आहे. संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या खुर्चीवर गदा येणे आता अटळ मानले जात आहे.








