व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दुष्काळी यादीत तालुका सुटल मागणीवर मुख्यमंत्र्यांचा खास शेरा

दुष्काळी यादीत तालुका सुटल मागणीवर मुख्यमंत्र्यांचा खास शेरा

विशेष टिपणी, ‘ग्राउंड ट्रुथिंग’ करून दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचे निर्देश

Amravati: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. जिल्ह्यातील आठपैकी सात तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट झाले असताना कारंजा तालुका मात्र या यादीतून वगळण्यात आला. या पार्श्वभूमीवर आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावती दौऱ्यादरम्यान भेट घेत कारंजा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

कारंजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न होण्यामागे पावसाची नोंद हा प्रमुख निकष ठरला आहे. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे ६६७ मिलिमीटर आहे. यंदा येथे ५४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीच्या सुमारे ८१ टक्के आहे. त्यामुळे ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या ‘ट्रिगर-१’ निकषात कारंजा तालुका बसला नाही.

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती

मात्र, केवळ पावसाची सरासरी पाहता तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचे पूर्ण चित्र समोर येत नसल्याचे आमदार सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. कारंजा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी असल्याने दुष्काळाचा निकष लागू करताना या बाबीचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत संबंधित मागणीपत्रावर विशेष टिपणी केली. कारंजा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी अर्थात ‘ग्राउंड ट्रुथिंग’ करून परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि त्याआधारे ‘ट्रिगर-१’ सक्रिय करून कारंजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना देण्यात आल्याचे आमदार वानखेडे यांनी सांगितले

‘यांचा मेंदूच चोरीला गेला’ फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यादीत तालुक्याचा समावेश करण्यासंदर्भातील आदेश लवकरच निघण्याची शक्यता असल्याचा दावा आमदार सुमित वानखेडे यांनी केला. ‘देवाभाऊ असताना काय चिंता,’ अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाबद्दल विश्वास व्यक्त केला. आता प्रत्यक्ष पाहणी आणि प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर कारंजा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होतो का, याकडे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!