ketan-agrawal-murder-case-ujjwal-nikam-fast-track-court-special-public-prosecutor-devendra-fadnavis : फास्टट्रॅक कोर्टासाठी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश
Mumbai : पुणे जिल्ह्यातील लोहगड परिसरात घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार कोणतीही कसूर ठेवणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्याबाबत आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश विधी व न्याय विभागाला दिले.
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्या पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांना पोलिसांनी अटक केली आहे. पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप दोघांवर असून पुणे पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत असून पोलिसांनी आता सिया गोयलच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Bjp event row : ‘हा तर जातीचा वाद… तुमच्या दैवताची शपथ घेऊन सांगा’ भाजप नेत्यांमध्ये राडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत विशाल अग्रवाल यांनी दोषींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी विशेष सरकारी वकील नेमावा आणि खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यास संमती दर्शवल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वडिलांनीही प्रथमच माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयातून बोलताना आपल्या मुलीवर लग्नासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नव्हता, असा दावा केला. केतन अग्रवाल यांचे स्थळ आल्यानंतर सिया स्वतः आनंदी होती आणि तिने स्वतःच्या इच्छेनेच केतन यांना पसंती दिली होती. त्यामुळे जबरदस्तीने हे लग्न लावण्यात आले होते, हा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिया गोयलच्या अटकेनंतर तिच्या कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून तिचे वडील प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल होते. अतिदक्षता विभागातून त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलविल्यानंतर त्यांनी प्रथमच या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपींचे मोबाईल डेटा, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक बाबींची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याचा निर्णय आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यास या बहुचर्चित प्रकरणाच्या सुनावणीला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
__








