Despite having 118 assured votes, Congress drew a blank; the Amravati result sends shockwaves through the MVA : अमरावतीच्या निकालाने मविआत खळबळ; उमेदवारांची माघार, मतदानासाठी व्हीप; तरीही मतांचे गणित बिघडले
Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला एकही मत न मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील तब्बल ११८ हक्काचे मतदार असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराला शून्य मते मिळाल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
निवडणुकीच्या १४ दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी माघार घेतल्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. त्यानंतर पक्षाची मते कुणाकडे वळवायची यावर अनेक बैठका झाल्या. अखेर काँग्रेसने मतदान न करण्याचा व्हीप जारी केला. मात्र, निकालानंतर पक्षाच्या मतांचे नेमके काय झाले, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.
Sanjay Dina Patil vs Sanjay Raut :”तू काय आम्हाला तुडवणार?” संजय जाधवांचा संजय राऊतांना थेट इशारा
या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे-पाटील यांनी ४५८ मते मिळवत विक्रमी विजय मिळविला. तर काँग्रेसच्या वाट्याला एकही मत आले नाही. विशेष म्हणजे २०१८ च्या निवडणुकीत उमेदवाराला पक्षांतर्गत विरोध असतानाही काँग्रेसला १७ मते मिळाली होती. त्यामुळे यंदाचा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे.
अमरावतीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे ११८ मतदार असताना पक्षाच्या उमेदवाराला एकही मत न मिळणे हा आत्मपरीक्षणाचा विषय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीच्या हक्काच्या मतांमध्ये झालेली ही मोठी गळती भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते.
निवडणुकीत सहा मते अवैध ठरली. यापैकी एका मतपत्रिकेवर चुकीची खूण करण्यात आली होती, तर पाच मतपत्रिका कोऱ्याच आढळून आल्या. त्यामुळे मतदान प्रक्रियेत नेमके काय घडले, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील काही मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले की इतर उमेदवारांकडे मते वळली, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. नियोजनाचा अभाव, समन्वयातील त्रुटी आणि अंतर्गत मतभेद यांचा फटका काँग्रेसला बसल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीतील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा यांना मिळालेली ३१ मते. वंचितकडे स्वतंत्रपणे इतके संख्याबळ नसताना ही मते कुठून आली, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
नवनिर्वाचित आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनीही यातील २७ मते नेमकी कोणाची आहेत, याचा शोध प्रसारमाध्यमांनी घ्यावा, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अमरावतीच्या राजकारणात पडद्यामागे काही वेगळीच समीकरणे तयार झाल्याची चर्चा अधिक रंगू लागली आहे.








