sanjay-jadhav-sanjay-dina-patil-vs-sanjay-raut-shiv-sena-political-clash : दिना पाटील-राऊत वादानेही पेटले राजकारण
Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षांतरानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटात गेलेल्या खासदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार सामना रंगला असून, परभणीचे खासदार संजय जाधव आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे.
सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्याचा इशारा दिला होता. पक्ष सोडून गेलेल्यांना जनतेसमोर उघडे पाडू आणि गद्दारीची किंमत चुकवावी लागेल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर संजय जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आव्हान दिले.
Legislative election : १० लाख घेतलेला एक तरी नगरसेवक दाखवा! पराभूत अतुल लोंढेंना भाजपचे खुले आव्हान
“तू काय आम्हाला तुडवणार? तुडवायलाही ताकद लागते. अशा प्रकारची भाषा संजय राऊत यांनी वापरणे योग्य नाही. ते राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. त्यांनी वैचारिक मुद्द्यांवर बोलावे, तुडवण्याची भाषा करू नये,” असे जाधव म्हणाले. त्यांनी राऊतांवर टीका करताना ते कधीही थेट जनतेतून निवडून आलेले नाहीत, त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना समजत नसल्याचा टोला लगावला.
जाधव यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. आमचा त्यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. मात्र पक्षातील काही व्यक्तींच्या कार्यपद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.
परभणीने नेहमीच धनुष्यबाण चिन्हाला साथ दिली आहे. आम्ही पैशासाठी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी पक्षांतर केलेले नाही. जर तसे असते तर 2022 मध्येच निर्णय घेतला असता. मात्र मतदारसंघातील विकासकामे आणि कार्यकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करूनच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला, असे जाधव यांनी सांगितले.
दुसरीकडे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनीही पक्ष सोडण्यामागील कारणे मांडताना अनेक गौप्यस्फोट केले. त्यांनी उमेदवारीपासून पक्षातील अंतर्गत राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. पक्षात काही मोजक्या लोकांचे वर्चस्व वाढल्याचा आरोप करत अनेक निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना विचारात न घेता घेतले जात असल्याचे त्यांनी म्हटले.
यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. पक्ष सोडण्यामागे विकासाचे कारण नसून आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक स्वार्थ असल्याचा दावा त्यांनी केला. काही आर्थिक व्यवहारांबाबत आपल्याकडे माहिती असल्याचे सांगत त्यांनी संबंधित प्रकरणांची चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील, असा इशाराही दिला.
राऊत यांनी आरोप केला की, काही खासदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळाल्यानंतरच त्यांनी पक्षाची भूमिका बदलली. काही व्यवहार अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आल्यामुळेच हे निर्णय घेतले गेल्याचा दावा त्यांनी केला. पक्षात झालेल्या चर्चांमध्ये याबाबत तपशीलवार माहिती समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय दिना पाटील यांनी एका कार्यक्रमात केलेल्या आक्रमक हावभावांचाही उल्लेख करत राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसैनिकांना धमकावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा देताना त्यांनी अत्यंत संतप्त शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे दोन्ही नेत्यांतील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसून आले.
Mp vikas nidhi : विकास निधी मिळत नसल्याचा दावा फोल? कोट्यवधींचा निधी पडूनच
दरम्यान, संजय जाधव यांनी मात्र भविष्यात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील आहोत आणि त्याच शिवसेनेत परत आलो आहोत, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी आरोप-प्रत्यारोपांकडे लक्ष न देता विकासकामांवर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष आता अधिकच उफाळून आला आहे. एका बाजूला विकासाच्या मुद्द्यावर पक्षांतराचे समर्थन केले जात असताना दुसऱ्या बाजूला गद्दारी, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक स्वार्थाचे आरोप होत आहेत. आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, शिवसेनेतील हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
___








