व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mahavitaran : एक्स्प्रेस फीडर लावूनही फायदा नाही; अकोल्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार?

Mahavitaran : एक्स्प्रेस फीडर लावूनही फायदा नाही; अकोल्याचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार?

Major water treatment plant hit by low pressure; Akola’s water supply likely to be disrupted : महान जलशुद्धीकरण केंद्राला कमी दाबाचा फटका; सणांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना

Akola अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्राला Mahan Water Treatment Plant मागील चार दिवसांपासून कमी विद्युतदाबाचा फटका बसत आहे. १६ ते १९ ऑगस्टदरम्यान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केवळ ३५० व्होल्ट विद्युतदाब मिळत असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून, शहराच्या पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महान येथे अकोला शहरासाठी ६५ एमएलडी आणि २५ एमएलडी क्षमतेची दोन जलशुद्धीकरण केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील विविध भागांना पुरविले जाते. मात्र, कमी विद्युतदाबामुळे पंप सुरळीतपणे चालविण्यात अडचणी निर्माण होत असल्याने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अकोला शहरातील अनेक भागांत सध्या सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच जलशुद्धीकरण केंद्राला कमी दाबाने वीज मिळत असल्याने पाणीपुरवठ्याचे संकट आणखी तीव्र होण्याची भीती आहे.

Harshwardhan Sapkal : अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील जळीतकांडावरून काँग्रेस आक्रमक !

वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांनी या प्रकारावर महावितरण आणि महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले आहे. जलशुद्धीकरण केंद्रासारख्या अत्यावश्यक यंत्रणेसाठी एक्स्प्रेस फीडरची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी महापालिका खर्च करते. असे असतानाही केंद्राला ३५० व्होल्ट इतका कमी विद्युतदाब मिळत असेल, तर एक्स्प्रेस फीडरचा नेमका उपयोग काय, असा सवाल देव यांनी उपस्थित केला.

जलशुद्धीकरण केंद्राला स्थिर आणि पुरेसा विद्युतदाब मिळतो आहे की नाही, एक्स्प्रेस फीडरची तांत्रिक क्षमता किती आहे आणि त्याच्या देखभाल-दुरुस्तीची स्थिती काय आहे, याची तातडीने तपासणी करण्याची मागणी देव यांनी केली. महापालिका वीजपुरवठ्यासाठी खर्च करीत असताना प्रत्यक्षात जलशुद्धीकरण केंद्राला आवश्यक विद्युतदाब मिळत नसेल, तर या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेची जबाबदारी निश्चित करावी, असेही त्यांनी म्हटले.

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महान जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत ठेवणे अत्यावश्यक आहे. महावितरण आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे पाहणी करून कमी विद्युतदाबाचे मूळ कारण शोधावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी देव यांनी केली.

Tuition Economy : मुळात ‘ट्युशन क्लासेस हवेतच कशाला?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली!

आवश्यक असल्यास पर्यायी विद्युत व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजन करून जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. अकोलेकरांना आधीच सहा-सात दिवसांनी पाणी मिळत असताना वीजपुरवठ्याच्या तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठ्यात आणखी विलंब होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“पाणी ही अत्यावश्यक नागरी सेवा आहे. महापालिका वीजपुरवठ्यासाठी खर्च करीत असताना आणि एक्स्प्रेस फीडरची व्यवस्था असतानाही कमी विद्युतदाबामुळे शहराचा पाणीपुरवठा प्रभावित होत असेल, तर ही बाब गंभीर आहे. प्रशासनाने तातडीने समस्या सोडवून अकोलेकरांचा पाणीपुरवठा सुरळीत करावा,” अशी मागणी निलेश देव यांनी केली.

error: Content is protected !!