Poor sanitation in the ruling party’s own ward sparks outrage; protest launched against the administration : सत्ताधाऱ्यांच्याच प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा; प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन
Malkapur मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता असतानाही शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. बारादरी-दुर्गानगर परिसरातील कचऱ्याचे ढिग अनेक दिवस उचलले जात नसल्याच्या निषेधार्थ बांधकाम सभापती शबाना परवीन साजीद अहमद खान यांचे पती साजीद खान यांनी स्वतः कचरा गोळा करून तो नगर परिषदेतील आरोग्य निरीक्षक अजय बयस यांच्या कक्षासमोर टाकत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घटनेमुळे नगर परिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सत्ताधारी काँग्रेसच्या कारभारावरही विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करावे लागत असल्याने प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातील समन्वयावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
साजीद खान यांनी वारंवार तक्रारी करूनही कचरा उचलला जात नसल्याचा आरोप केला. त्यांनी फावडे व टोपल्याच्या साहाय्याने परिसरातील कचरा गोळा केला आणि तो थेट आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर आणून टाकला. या प्रकारामुळे नगर परिषद कार्यालयात काही काळ खळबळ उडाली.
Election commission : निवडणूक आयोगाचा नियम मोडला, काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा
शहरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी दरवर्षी मोठा निधी खर्च केला जात असतानाही अनेक भागांत कचऱ्याचे ढिग साचत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरातील विविध भागांतील स्वच्छतेच्या समस्या अद्याप कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, साजीद खान यांनी यापूर्वीही घंटागाडी चालवून स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हे आंदोलन केवळ नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी होते की प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा राजकीय संदेश होता, याबाबत शहरात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
स्वतःच्या पक्षाची नगर परिषदेत सत्ता असताना स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नासाठी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असेल, तर तो प्रशासनाच्या निष्क्रियतेबरोबरच सत्ताधाऱ्यांच्या प्रभावी नियंत्रणावरील प्रश्न मानला जात असल्याची चर्चा सध्या मलकापूरच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.








