st-bus-free-toilet-facility-msrtc-78th-foundation-day-cleanliness-drive-passenger-benefits : ७८व्या वर्धापनदिनानिमित्त महामंडळाचा मोठा निर्णय
Mumbai : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८व्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. १ जूनपासून राज्यभरातील एसटी स्थानके आणि आगारांमधील सर्व स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांना पूर्णपणे मोफत करता येणार आहे. यासोबतच महामंडळाने राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करत प्रवासी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा संकल्प केला आहे.
राज्यातील अनेक बसस्थानके आणि आगारांमधील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. स्वच्छतागृह वापरण्यासाठी शुल्क आकारले जात असतानाही स्वच्छतेचा दर्जा समाधानकारक नसल्याची नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने स्वच्छतागृह वापर शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा आणि त्यांची देखभाल स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Bjp candidates : रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरुण लखानीं, प्राजक्त तनपुरेंनाही उमेदवारी !
महामंडळाने यापूर्वी स्वच्छतागृहांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांकडे सोपवली होती. मात्र, अपेक्षित दर्जाची सेवा मिळत नसल्याने आणि अस्वच्छतेच्या तक्रारी कायम राहिल्याने ही व्यवस्था बंद करण्यात आली आहे. आता स्वच्छतागृहांची स्वच्छता, देखभाल आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळाकडे असेल. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांमध्ये एकसमान आणि दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत बसस्थानके आणि आगार परिसराची दर चार तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी बंद किंवा दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या पाणपोई पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्येही आवश्यक सुविधा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचारी आणि प्रवासी दोघांनाही अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
प्रवाशांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रमुख बसस्थानकांवर मोफत पिण्याच्या पाण्याची केंद्रे उभारण्याची योजनाही महामंडळाने आखली आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत एसटीचा वापर करणाऱ्या लाखो प्रवाशांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. प्रवासादरम्यान होणारा अतिरिक्त खर्च कमी होण्यासोबतच स्वच्छतेच्या सुविधांमध्येही सुधारणा होणार असल्याने प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Legislative election : सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस; पोटे-देशमुखांच्या लढतीकडे लक्ष
एसटी महामंडळाचा वर्धापनदिन दरवर्षी १ जून रोजी साजरा केला जातो. १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर पहिली एसटी बस धावली होती. ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी सेवेने आज ७८ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. या विशेष वर्षानिमित्त महामंडळाने राज्यभरात ७८ हजार रोपांची लागवड करण्याचाही संकल्प केला आहे.
दरम्यान, एसटी प्रवास अधिक सुरक्षित, आधुनिक आणि आरामदायी करण्यासाठी आगामी काळात महामंडळाच्या ताफ्यात सुमारे ८ हजार नव्या बस दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








