Some are already accused of looking for reasons : काही जण आधीच कारणे शोधत असल्याचा आरोप
Nagpur : राज्यात आज सकाळपासून महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर सूचक आरोप केले आहेत.
महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षांकडून राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मुंबईत मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी मार्करने खूण केली जात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ही मार्करने केलेली खूण सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या मुद्द्यावर विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Municipal Election 2026 : ‘शाई पुसा आणि परत जा, दुबार मतदान करा हा कसला विकास?’
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई आणि पत्नीसोबत नागपूरमध्ये मतदान केले. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांना बोटावर लावली जाणारी शाई नसून मार्कर आहे आणि ती पुसली जात असल्याच्या तक्रारींबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या सर्व बाबी ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेनचा वापर करण्यात आला आहे. तथापि, जर कोणाला याबाबत आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी.
मात्र, याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान करत म्हटले की, काही लोक उद्याचा निकाल आधीच गृहित धरून निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
BMC Election 2026 : मतदान करून परतलेल्या मतदारांच्या बोटावरील शाई पुसली गेली
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यंदा राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, हा मार्कर 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात खूण पुसली जात असल्याचे प्रकार समोर आल्याने या निर्णयावर टीका होत आहे.
याशिवाय, निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेल्या काही निर्णयांमुळेही वाद निर्माण झाला आहे. PADU नावाचे नवीन यंत्र निवडणूक प्रक्रियेत आणण्यात आले असून, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असे त्याचे नाव आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये ईव्हीएम बॅकअप म्हणून हे यंत्र वापरले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते. त्यामुळे हे यंत्र अचानक का आणले, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांचा आरोप आहे की, या निर्णयाची माहिती शेवटच्या क्षणी देण्यात आली.
Municipal Election: महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू !
निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून मात्र हे यंत्र केवळ तांत्रिक अडचण आल्यास, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच वापरले जाईल, असा दावा करण्यात आला आहे. मुंबईसाठी एकूण 140 PADU यंत्रे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशीच शाई, PADU मशीन आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरून सुरू झालेल्या या वादामुळे मुंबई महापालिका निवडणुकीभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, उद्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
__








