Supreme Court firmly refuses to postpone elections : निवडणुका पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ठाम नकार
Delhi: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उद्भवलेल्या प्रलंबित वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत निवडणुका किंवा निकालाविषयी कोणताही बदल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
३१ जानेवारीपूर्वी पूर्ण मुदतीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत, मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार याबाबत कोर्टाने अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल आता ठरलेल्या तारखेलाच जाहीर होणार असून २१ डिसेंबरला राज्यभराचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांनी पूर्वी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी २ डिसेंबरला झालेल्या मतदानाचा निकाल २१ डिसेंबरपर्यंत न थांबवता तत्पूर्वी घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळून कोर्टाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत २ डिसेंबरला झालेल्या मतदानासोबत २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानाचा निकालही एकत्रितपणे २१ डिसेंबरलाच घोषित करण्याचा आदेश दिला. निवडणूक प्रक्रियेचा वेग आणि शिस्त अबाधित राहावा यावर सर्वोच्च न्यायालयाने विशेष भर दिला.
२० डिसेंबरला होणाऱ्या मतदानात तांत्रिक, प्रशासकीय किंवा कायदेशीर कारणांमुळे कोणतीही अडचण निर्माण झाली तरी निकाल पुढे ढकलण्याचा कोणताही पर्याय नसल्याचे कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच निवडणुका किंवा मतमोजणी पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य शासनाला नसून दिलेल्या मुदतीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याची पुनर्रावृत्ती कोर्टाने केली. निवडणुका प्रलंबित ठेवण्याचा विचारही मान्य होणार नाही, असे कठोर निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने राज्याला आणि निवडणूक आयोगाला कठोर आदेश दिले.
Dr. Kiran Patil : भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण होणार!
आजचा निर्णय आल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसोबत सर्वच पक्षांनी आता २१ डिसेंबरवर नजर रोखली आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणात कोणते उलटफेर होतील, कोणते गड ताब्यात राहतील आणि कोणते किल्ले ढासळतील हे पाहण्यासाठी जनतेचे लक्ष आता मतमोजणीच्या दिवसाकडे केंद्रित झाले आहे. ही घडामोड निवडणुकीच्या राजकारणात मोठी हलचल माजवणार असून येत्या काही दिवसांत प्रचार, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय चर्चा आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








