व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nagpur municipal corporation : भाजपचे ‘२४ तास’ पाण्याचे दावे फोल; नागपूर महापालिकेत...

Nagpur municipal corporation : भाजपचे ‘२४ तास’ पाण्याचे दावे फोल; नागपूर महापालिकेत अनेक वर्षानंतर फुटले मडके!

BJP’s claims of ‘24-hour’ water supply exposed; pots smashed in Nagpur Municipal Corporation after many years : ओसीडब्ल्यूविरोधात महापालिकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र

Nagpur : घराघरांत २४ तास शुद्ध पाणी देणार, आता टाक्यांची गरज उरणार नाही, असे दावे करत मिरवणाऱ्या नागपूर महापालिकेच्या ‘२४ बाय ७’ पाणी योजनेचे पुरते वाभाडे निघाले आहेत. भाजप नेत्यांनी ज्या योजनेचे तोंडभरून कौतुक केले, ती योजना आता पूर्णपणे फोल ठरली असून, भर उन्हाळ्यात नागपूरकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचाच उद्रेक म्हणून आज अनेक वर्षांनंतर नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात काँग्रेसतर्फे जोरदार ‘मडके फोड’ आंदोलन करण्यात आले.

निवडणुकीच्या प्रचारात आता नागपुरात पाण्यासाठी मडके फोड आंदोलन बंद झाले, अशी बढाई मारणाऱ्या भाजप नेत्यांना काँग्रेसने या आंदोलनातून आरसा दाखवला आहे. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नगरसेवक आणि त्यांच्या परिसरातील संतप्त नागरिकांनी थेट महापालिका मुख्यालयात मडके फोडून प्रशासनाविरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला.

Mlc election : विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज

या आंदोलनापूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापौर नीता ठाकरे यांना एक निवेदन दिले. यावेळी तुम्ही चोवीस तास पाणी पुरवठ्याचा दावा करता, प्रत्यक्षात मात्र आमच्या वस्त्यांमध्ये एक तासभरही पाणी मिळत नाही, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, महापालिकेतील प्रशासक राज संपल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक दोघेही पाणी पुरवठा करणाऱ्या ‘ओसीडब्ल्यू’ कंपनीच्या विरोधात एकवटले आहेत. सत्ता स्थापनेनंतर महापालिकेच्या पहिल्याच बैठकीत ओसीडब्ल्यूच्या वाढीव बिलांबाबत लोकप्रतिनिधींनी मोठा असंतोष व्यक्त केला होता, ज्यावरून महापौर नीता ठाकरे यांनी कंपनीला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता.

मध्यंतरी, या २४ बाय ७ पाणी योजनेसाठी पुढाकार घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. पाण्याची गळती आणि चोरी रोखण्यात कंपनीला पूर्णपणे अपयश आले असून, ८० टक्के जलवाहिन्या बदलल्यानंतरही कंपनी चोवीस तास सोडा, साधे १२ ताससुद्धा पाणी पुरवठा करू शकलेली नाही, अशा शब्दांत गडकरींनी खडसावले होते आणि कंपनीला अल्टिमेटम दिला होता. हे पाहता आता ओसीडब्ल्यूचे नागपुरातील दिवस संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

Red heat alert : विदर्भात उष्णतेचा कहर, तीव्र लाट कायम 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट

जलकुंभ स्वच्छता आणि जलवाहिनी जोडण्याच्या नावाखाली कंपनीकडून वारंवार ‘शटडाऊन’ घेतला जातो आणि भर उन्हाळ्यात अशी कामे काढून लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप कंपनीवर होत आहे. त्यातच आता महापालिका आणि ओसीडब्ल्यू कंपनी यांच्यात देयकावरून न्यायालयीन वादही सुरू झाला आहे. एकंदरीत, महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि कंपनीच्या मनमानीमुळे नागपूरकरांचा गळा सुकला असून, चोवीस तास पाण्याचे दावे केवळ कागदावरच ठरल्याचे या आंदोलनाने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!