nashik-crime-news-company-sexual-harassment-religious-conversion-case-investigation : दिल्लीच्या पथकाची झाडाझडती, १५० कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश
Nashik : नाशिकमधील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन कंपनीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी कंपनीत सखोल झाडाझडती सुरू केली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाला राष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे.
तपासाच्या पार्श्वभूमीवर कंपनी प्रशासनाने १५० कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. चौकशीदरम्यान कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपनी परिसरात सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
कामगार उपायुक्त कार्यालयाचे पथक तपासासाठी कंपनीत पोहोचले असता तेथे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळले. यावेळी अधिकाऱ्यांनी शॉप ॲक्ट परवाना तसेच इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली असून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अंतर्गत चौकशीत कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याची माहिती समोर आली आहे.
Sexual exploitation case : दोन मुलींच्या लैंगिक शोषणाची कबुली, आरोपीच्या घरावर बुलडोजर
पोलीस तपासात या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून निदा खान हिचे नाव पुढे आले आहे. ती कंपनीत ऑपरेशन विभागात व्यवस्थापक आणि टीम लीडर म्हणून कार्यरत होती. कामाच्या बैठकींच्या माध्यमातून काही महिला कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. तसेच विरोध करणाऱ्या महिलांना मानसिक व लैंगिक छळ सहन करावा लागत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व हालचाली एका विशिष्ट व्हॉट्सॲप गटाच्या माध्यमातून केल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणात व्यापक नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता तपासली जात आहे.
या प्रकरणी मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये कंपनीच्या मानव संसाधन विभागातील अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तिच्या चौकशीतूनच मुख्य आरोपीची भूमिका स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अद्याप फरार असून तिच्या शोधासाठी पोलिसांची तीन स्वतंत्र पथके कार्यरत आहेत.
loksabha seats : लोकसभेतील जागा ५४५ वरून ८५० करण्याचा प्रस्ताव !
या संपूर्ण प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून आयोगाचे पथक १८ एप्रिल रोजी नाशिकमध्ये येणार आहे. हे पथक पीडित महिलांशी संवाद साधून संपूर्ण घटनेचा आढावा घेणार असून, पुढील कारवाईसाठी अहवाल तयार करणार आहे. या घटनेमुळे नाशिकसह राज्यभरात संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.








