व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Nasrapur case : नसरापूर बालिकेवरील अत्याचार-हत्याप्रकरणी नराधमाला मरेपर्यंत फाशी

Nasrapur case : नसरापूर बालिकेवरील अत्याचार-हत्याप्रकरणी नराधमाला मरेपर्यंत फाशी

nasrapur-minor-assault-murder-case-verdict-pune-court-death-sentence-bhimrao-kamble : पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, पोलिसांच्या तपासाचे भर न्यायालयात कौतुक

Pune : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार आणि हत्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. अल्पवयीन बालिकेवरील अमानुष अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत दुर्मीळ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत कठोर शिक्षा सुनावली. निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले, तर पीडितेच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

या खटल्यात पुणे पोलिसांनी केलेल्या जलद आणि शास्त्रशुद्ध तपासाचे न्यायालयाने विशेष कौतुक केले. गुन्हा उघडकीस आल्यानंतर अवघ्या १६ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाला प्राधान्य देत नियमित सुनावणी घेतली आणि केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत खटल्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या या वेगवान कार्यपद्धतीमुळे न्यायप्रक्रियेबाबत सर्वसामान्यांमध्ये विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Women reservation : पंतप्रधान मोदींना १० लाख पोस्ट कार्ड, अन् मिस कॉल, महिला आरक्षणासाठी काँग्रेसच्या मोहिमेला नागपुरातून सुरुवात

निकाल देताना न्यायालयाने आरोपीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर शब्दांत भाष्य केले. आरोपीने यापूर्वीही अल्पवयीन मुलगी आणि महिलांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करत, समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणातील तपासात सहभागी असलेल्या पुणे पोलिसांसह फॉरेन्सिक तज्ज्ञ, सायबर तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांचेही न्यायालयाने विशेष अभिनंदन केले. वैज्ञानिक पुरावे, तांत्रिक तपास आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीमुळेच दोषारोप सिद्ध होऊन आरोपीला शिक्षा सुनावणे शक्य झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हा तपास आणि संपूर्ण प्रक्रिया इतर तपास यंत्रणांसाठी आदर्श ठरेल, असेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

Weather updates : पुढील ६ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

या खटल्यादरम्यान एकूण ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सुनावणीदरम्यान कोणताही अनावश्यक विलंब होऊ न देता न्यायालयाने सलग कामकाज केले. उन्हाळी सुट्टीनंतर या खटल्याला प्राधान्य देत अल्पावधीत सुनावणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे अल्पावधीत न्याय मिळाल्याचे समाधान पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केले.

नसरापूर प्रकरणातील हा निकाल केवळ एका गुन्हेगाराला शिक्षा देणारा निर्णय नसून, बालकांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांबाबत न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणा संवेदनशील व कटिबद्ध असल्याचा ठोस संदेश देणारा ठरला आहे. जलद तपास, प्रभावी पुरावे आणि वेळेत झालेली न्यायप्रक्रिया यामुळे हा खटला देशातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी आदर्श मानला जात आहे.

___

error: Content is protected !!