Water shortage in school : विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, पालक संतप्त
Bhandara जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या पाचगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात सध्या पाण्याच्या भीषण टंचाईमुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे विद्यार्थी अक्षरशः पाण्याच्या थेंबासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. शाळेच्या प्रांगणात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
टँकरवर आधार, पण तोही अपुरा
गेल्या महिन्याभरापासून शाळेला नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. प्रशासनाने टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला असला तरी, तो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांपुरता पुरेसा नाही. स्नान, प्रातर्विधी आणि जेवणाच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुलांच्या राहण्याच्या खोल्यांत साफसफाई होत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेले शौचालये आणि दुर्गंधी यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
खासदारांचे अचानक निरीक्षण, प्रशासनावर संतापाचा तोफ
विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही समस्या वारंवार मांडल्यावर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी अचानक शाळेची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वास्तव समजून घेतले. यावेळी परिसरातील अस्वच्छता आणि पाण्याच्या व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे संतप्त झाले. संबंधित अधिकाऱ्यांना झाडाझडती घेत त्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
पालकही झाले संतप्त, आंदोलनाची तयारी
जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी जिल्ह्याच्या विविध भागांतून निवडून आलेले असतात. दर रविवारी आपल्या मुलांना भेटण्यासाठी आलेले पालक शाळेच्या इमारतीच्या पडवीतच मुलांसह बसलेले दिसत होते. त्यांच्या मुलांसाठी आणलेले घरगुती डबे झाडाखाली अंथरूण मुलांना जेवायला दिले जात होते. कडक उन्हामध्ये उघड्यावर बसलेले हे पालक प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. शाळेत पालकांसाठी किमान सुविधा उपलब्ध नसल्याने ते नाराज असून, समस्यांचे त्वरित समाधान न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
Sonia & Rahul Gandhi: सरकारचं अपयश झाकण्यासाठीच ‘ईडी’चा आधार
सरकारी योजनेतील गोंधळ उघड
प्रधानमंत्री श्री योजनेअंतर्गत चालणाऱ्या या संस्थेची ही दुरवस्था केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी कशी होत आहे, याचे उदाहरण ठरत आहे. जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली शाळेच्या सुविधा नियोजित होतात, मात्र गेल्या नऊ वर्षांपासूनही पाण्याचा प्रश्न कायम आहे.








