व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ९० पदाधिकारी राजीनामा देणार? बुलढाण्यात हायव्होल्टेज घडामोडी

NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ९० पदाधिकारी राजीनामा देणार? बुलढाण्यात हायव्होल्टेज घडामोडी

About 90 office-bearers of the Nationalist Congress Party are likely to resign in support of Nazer Kazi : नाझेर काझींना यंदाही उमेदवारी नाकारली; नाराजीचा स्फोट, समर्थनार्थ पदाधिकारी एकवटले

Buldhana राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये विधान परिषद तिकीट वाटपावरून अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. अल्पसंख्यांक सेलचे राज्य पदाधिकारी अॅड. नाझेर काझी यांना यावेळीही उमेदवारी नाकारण्यात आल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. परिणामी, सुमारे ९० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे देण्याची तयारी दर्शविल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

गेल्या पाच ते सात वर्षांपासून विधान परिषदेसाठी प्रयत्न करणाऱ्या काझी यांना पुन्हा डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. २९ एप्रिल रोजी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या बुलढाणा दौऱ्यादरम्यानच या नाराजीची कुजबुज सुरू झाली होती. ३० एप्रिल रोजी ती उघडपणे समोर आली आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतला. यामुळे पक्षाची नियोजित बैठकही रद्द करण्यात आली.

Water crisis : खामगावात ‘ड्राय रन’ कायम; पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापलं!

रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या घडामोडींमध्ये, पालकमंत्री पाटील विश्रामगृहावर दाखल होताच पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. यामध्ये मनिष बोरकर, शेखर बोंद्रे, तुषार बोंद्रे, संतोष लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, महेश देवरे, सुजीत देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री मकरंद पाटील यांनी, “हा आमचा घरातील विषय असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली जाईल. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

NCP Ajit Pawar : एक नाव पुढे, जिल्ह्यातील अनेकांची स्वप्ने धुळीस मिळाली

दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी केवळ आपल्या पदांचे राजीनामे देण्याची भूमिका घेतली असून प्राथमिक सदस्यत्व कायम ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पक्षांतर्गत दबाव वाढवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. विश्रामगृहावर उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चेतून नेमका तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी (अजित पवार गट)ची संघटनात्मक एकजूट आणि आगामी राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!