uddhav-thackeray-vidarbha-tour-rebel-mps-political-counterattack-washim-yavatmal : ‘निष्ठेची ताकद दाखवणार’ म्हणत बंडखोरांच्या मतदारसंघातून पलटवार
Nagpur शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी पक्षांतर करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी विदर्भातून जोरदार राजकीय मोहीम सुरू केली आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून सुरू झालेल्या या दौऱ्याला पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातूनच पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दौऱ्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओ टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोरांवर निशाणा साधत “आता पलटवार होणार”, “फितूरांच्या फितुरीला जशास तसे उत्तर मिळणार” आणि “निष्ठेची ताकद पुन्हा दाखवणार” असे स्पष्ट संदेश दिले आहेत. या टीझरमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात, “मला अन्यायाविरुद्ध लढणारे सैनिक हवेत, पाठीत वार करणारे नाहीत. मी संकटांपुढे झुकणारा नाही, पळून जाणारा नाही. मी पर्वतासारखा ठाम उभा राहीन,” असा निर्धार व्यक्त करत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे.
दरम्यान, नागपूरकडे जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. विमान प्रवासादरम्यान झालेल्या संवादामुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली असली, तरी उद्धव ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याचा मुख्य भर संघटन मजबूत करण्यावर आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यावर असल्याचे स्पष्ट केले आहे.
या दौऱ्याची सुरुवात यवतमाळ येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याने होत असून, त्यानंतर वाशिम येथेही मोठा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पक्षांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्या सोबत आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघातूनच संघटनात्मक पुनर्बांधणीची सुरुवात करत उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसलेल्या धक्क्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचा आणि आगामी राजकीय लढाईसाठी संघटना अधिक सक्षम करण्याचा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातही पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला असून, आमदार कैलास पाटील यांनी “धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथील शिवसैनिक पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठावान आहेत,” असा विश्वास व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांची धाराशिव येथे होणारी जाहीर सभा देखील पक्षासाठी महत्त्वाची मानली जात असून, या सभेतून आगामी राजकीय रणनीतीबाबत मोठे संकेत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेली आक्रमक भूमिका आणि बंडखोरांच्या मतदारसंघातून सुरू केलेली ही पलटवार मोहीम राज्याच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी ठरणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








