raj-thackeray-slams-vishwas-nangare-patil-rss-post-political-reaction: ‘खाकीचा रंग पोलिसांचा की संघाचा?’ केला बोचरा सवाल
Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेत थेट सोशल मीडियावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पोलिस अधिकाऱ्याने कोणत्याही राजकीय किंवा विचारधारात्मक संघटनेशी सार्वजनिकरित्या निष्ठा व्यक्त करणे हे निष्पक्षतेच्या तत्त्वाला बाधक असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांना कठोर शब्दांत सुनावले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या कार्याचा गौरव करणारे वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट करत पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक संघटनेपासून समान अंतर राखले पाहिजे, अशी भूमिका मांडली.
Tukaram mundhe : महिन्याभरातच भेसळखोरांवर मुंढेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
“आयपीएस अधिकारी म्हणून तुमची निष्ठा केवळ पोलीस दल आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्याशी असली पाहिजे. जर एखाद्या संघटनेबद्दल इतकीच आपुलकी असेल, तर आधी सरकारी सेवेचा राजीनामा द्या आणि त्यानंतर त्या संघटनेत किंवा राजकारणात प्रवेश करा,” असा सल्लाच राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांना दिला.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले वक्तव्य करत म्हटले की, “नांगरे पाटील यांच्या वर्दीचा खाकी रंग हा पोलीस दलाचा आहे, असा आमचा समज होता. मात्र तो संघाच्या आधीच्या खाकीचा आहे, हे आता कळत आहे.” या शब्दांत त्यांनी नांगरे पाटील यांच्या भूमिकेवर उपरोधिक टीका केली.
राज ठाकरे यांनी केवळ नांगरे पाटील यांनाच लक्ष्य न करता राज्य सरकारलाही सवाल केला. “एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची अशी भूमिका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मान्य आहे का? आज जर अशा कृतीकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर उद्या दुसऱ्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यक्रमात एखादा अधिकारी सहभागी झाला, तर सरकारची भूमिका काय असेल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी २०१२ मधील रझा अकादमीविरोधातील मनसेच्या मोर्च्याचाही उल्लेख केला. त्या वेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने मनसेने पोलिसांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अभिनंदन केल्याने तत्कालीन सरकारने संबंधित कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले होते, अशी आठवण करून देत, “त्यावेळी ज्या निष्पक्षतेचा आग्रह धरण्यात आला होता, तोच निकष आता विश्वास नांगरे पाटील यांच्या बाबतीत लागू होणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Uday Samant : ‘ना पोलिस बंदोबस्त, ना पायलट गाडी; माझ्याच बाबतीत असं का होतंय?’
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी विश्वास नांगरे पाटील यांच्याबद्दल वैयक्तिक आदर व्यक्त करत त्यांना आवाहन केले. “तुम्ही एक सक्षम आणि कार्यक्षम अधिकारी आहात. सरकारला किंवा कोणत्याही संघटनेला खूश करण्यासाठी तुमची सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवू नका. सरकारी अधिकाऱ्यांची निष्पक्षता ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे,” असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या या पोस्टमुळे राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक भूमिकेची मर्यादा, सरकारी सेवेतील निष्पक्षता आणि राजकीय संघटनांशी असलेले संबंध या मुद्द्यांवर आता नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








