व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rohit pawar : ‘माँ कामाख्या दौऱ्यातील एका व्यक्तीची पदे गेली, दुसऱ्याच्या घरात...

Rohit pawar : ‘माँ कामाख्या दौऱ्यातील एका व्यक्तीची पदे गेली, दुसऱ्याच्या घरात तिसरे पद आले’

rohit-pawar-targets-sunil-tatkare-over-ashok-kharat-case-political-game-maharashtra : खरात प्रकरणावरून रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा नेमका रोख कुणाकडे?

Mumbai : शेकडो महिलांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. सामाजिक माध्यमावरील त्यांच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे असल्याची चर्चा रंगली आहे.

अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्यासोबतचे काही फोटो आणि संबंधांबाबतच्या चर्चांमुळे रुपाली चाकणकर यांच्यावर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या संपूर्ण घडामोडींकडे ‘पॉलिटिकल गेम’ म्हणून पाहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

https://sattavedh.com/harshwardhan-sapkal-bjp-offered-crores-of-rupees-to-opposition-candidates-to-ensure-unopposed-elections-harshvardhan-sapkal-makes-serious-allegatio

 

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये दावा केला की, खरात प्रकरणात सत्तेतील तिन्ही घटक पक्षांतील काही नेत्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या चर्चा असूनही आतापर्यंत केवळ एका व्यक्तीला लक्ष्य करण्यात आले. त्यांनी म्हटले की, ज्यांना लक्ष्य करण्यात आले त्या व्यक्तीसोबत आणखी एक राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तीही संबंधित होती. मात्र त्या व्यक्तीचे नाव किंवा भूमिका चर्चेत आणली गेली नाही. उलट त्या नेत्याच्या कुटुंबात आणखी एक महत्त्वाचे राजकीय पद आले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदे गेली, तर दुसऱ्याच्या घरात आधीच दोन पदे असताना आता तिसरेही पद आले’ असा उल्लेख केला आहे. या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे. कारण नुकतेच त्यांची कोकण विभागातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी ते खासदार असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यही विविध राजकीय पदांवर कार्यरत आहेत.

Amravati shivsena: अमरावती उद्धवसेनेत फूट, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, शिंदेसेनेत दाखल होण्याची चर्चा

दरम्यान, २०२१ मध्ये रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांनी एकत्र गुवाहाटी येथील माँ कामाख्या देवी मंदिराला भेट दिल्याचे फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले होते. याच दौऱ्याचा संदर्भ देत रोहित पवार यांनी आपली टीका अधिक धारदार केली आहे. त्यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या विधानांमुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

खरात प्रकरणाच्या चौकशीबाबत आणि त्यासंदर्भातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. एका बाजूला विरोधक सत्ताधाऱ्यांवर निवडक कारवाईचा आरोप करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून या आरोपांना अद्याप अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची चिन्हे दिसत आहेत.

___

error: Content is protected !!