व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sandeep deshpande : संजय दिना पाटील नव्या वादात; फरार आरोपीसोबतचा फोटो

Sandeep deshpande : संजय दिना पाटील नव्या वादात; फरार आरोपीसोबतचा फोटो

sandeep-deshpande-serious-allegations-on-sanjay-dina-patil-photo-controversy : संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप, सखोल चौकशीची मागणी

Mumbai : पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. एका संशयास्पद छायाचित्राचा उल्लेख करत त्यांनी पोलिस आणि राज्याचे गृहमंत्री यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी एक छायाचित्र दाखवत त्या व्यक्तीची ओळख, त्याच्यावरील गुन्हे आणि खासदार संजय दिना पाटील यांच्याशी असलेले संबंध याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. नाशिकमधील सुमारे दहा कोटी रुपयांच्या केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपीसोबत या व्यक्तीचा संबंध आहे का, तसेच हीच व्यक्ती खासदारांच्या संपर्कात का होती, याचा खुलासा पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.

देशपांडे यांनी आणखी दावा केला की, काही दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झालेली संजय दिना पाटील यांची गाडी संबंधित व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती त्यांच्याकडे आहे. संबंधित व्यक्तीचा खासदारांसोबतचा फोटो समोर आला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, या आरोपांबाबत अद्याप अधिकृत तपास यंत्रणांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

Modi cabinet : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट? धर्मेंद्र प्रधानांसह अनेक मंत्र्यांची गच्छंती !

पत्रकारांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणावरही संदीप देशपांडे यांनी जोरदार टीका केली. एका खासदाराने पत्रकारांशी अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाहीला आणि संविधानिक मूल्यांना आव्हान देणारे असल्याचे त्यांनी म्हटले. पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली.

संजय दिना पाटील यांनी नंतर व्यक्त केलेल्या दिलगिरीवरही देशपांडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ती मनापासून व्यक्त केलेली माफी नसून पत्रकारांवर उपकार केल्यासारखी असल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या वक्तव्यात पश्चात्ताप किंवा खंत कुठेही दिसून आली नसल्याचेही देशपांडे म्हणाले.

यावेळी त्यांनी खासदारांना मिळालेल्या वाय प्लस सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला. सुरक्षा यंत्रणांनी आपल्या संरक्षणाखालील व्यक्तीकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यापूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत, तोच न्याय संजय दिना पाटील यांनाही लागू होतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Neet paper leak : नीट पेपर लीक माफिया आणि धर्मेंद्र प्रधान यांचे संबंध काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधताना संदीप देशपांडे म्हणाले की, राज्य सरकार नेहमी कायद्यापुढे सर्व समान असल्याचा दावा करते. त्यामुळे या प्रकरणातही निष्पक्ष चौकशी करून कायद्यापुढे कोणीही मोठे नाही, हे सरकारने कृतीतून सिद्ध करावे.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी केलेले सर्व आरोप हे त्यांच्या पत्रकार परिषदेत मांडलेल्या दाव्यांवर आधारित असून या प्रकरणात संबंधित तपास यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका किंवा निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच खासदार संजय दिना पाटील यांच्याकडूनही या नव्या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

error: Content is protected !!