व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Modi cabinet : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट? धर्मेंद्र प्रधानांसह अनेक मंत्र्यांची गच्छंती...

Modi cabinet : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट? धर्मेंद्र प्रधानांसह अनेक मंत्र्यांची गच्छंती !

modi-government-cabinet-expansion-dharmendra-pradhan-srikant-shinde-possible-new-ministers : श्रीकांत शिंदे, शक्तिकांत दासांसह नव्या चेहऱ्यांना संधीची चर्चा

New Delhi : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ विस्तार अथवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून गेल्या काही दिवसांपासून याबाबत सखोल चर्चा सुरू होती. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विस्तारात काही अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन वर्षांतील कामगिरीच्या अहवालाच्या आधारे काही मंत्र्यांबाबत कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुका आणि राष्ट्रीय राजकारणातील बदलते समीकरण लक्षात घेऊन काही नव्या आणि तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते. महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडील आरोग्य राज्यमंत्रीपद बदलण्याची शक्यता असून त्यांच्याकडे आयुष खाते कायम राहू शकते, असेही बोलले जात आहे.

माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव शक्तिकांत दास यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मानव संसाधन विकास (एचआरडी) खात्याची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्याची चर्चा आहे.

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मेरठचे खासदार अरुण गोविल यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तसेच मध्य प्रदेशातील विष्णू दत्त शर्मा आणि बिहारमधील जनार्दन सिंह सिग्रीवाल यांच्या नावांचाही संभाव्य मंत्र्यांच्या यादीत समावेश असल्याचे बोलले जात आहे.

Neet paper leak : नीट पेपर लीक माफिया आणि धर्मेंद्र प्रधान यांचे संबंध काय?

पंजाबच्या राजकारणालाही या विस्तारात विशेष महत्त्व दिले जाऊ शकते. पंजाबमधील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. रवनीत सिंह बिट्टू यांच्या जागी तरुण चुग यांना संधी मिळू शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार करताना उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि मणिपूरमधील आगामी विधानसभा निवडणुका, एनडीएतील मित्रपक्षांचे राजकीय संतुलन, संघटनात्मक मजबुती, राष्ट्रपती निवडणुकीची रणनीती तसेच मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल या सर्व बाबींचा विचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Prakash ambedkar : काँग्रेसचे उमेदवार पळपुटे, महाविकास आघाडीचे विसर्जन; प्रकाश आंबेडकर यांनी डागली तोफ

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ५ जुलै २०१६ रोजी आणि दुसऱ्या कार्यकाळात ६ ते ७ जुलै २०२१ रोजी मोठे मंत्रिमंडळ फेरबदल करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा या राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

error: Content is protected !!